Uddhav Thackeray Fraction: गेल्या काही दिवसांपासून रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर हिंसाचारात झालं. अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात घडलेल्या काही घटनांवर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकारला यावरून धारेवर धरलं असताना ठाकरे गटाकडून या मुद्द्यावर परखड भूमिका मांडण्यात आली आहे.
“हे महाराष्ट्राचे दुर्दैवं म्हणावं लागेल”
“रामाच्या जन्मदिनी त्याचे भक्त म्हणवून घेणारे हिंसा करतात. इतरांच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक करतात, हे चित्र जगातल्या चौथ्या की पाचव्या आर्थिक महासत्तेस शोभा देणारे नाही. उलट देशाची ‘शोभा’ करणारेच हे प्रकार आहेत. राम हे हिंदुस्थानचे महानायक मानले जातात. त्या महानायकाचा जन्मदिवस दंगलीसाठी ओळखला जावा हे त्या महानायकाचे दुर्दैव म्हणावे लागेल”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
“महाराष्ट्रात धनुष्यबाणाचा सौदा झाल्यापासून…”
“हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? रामनवमीच्या शोभायात्रेत नंग्या तलवारी नाचवण्याचे प्रयोजन काय? प्रभू श्रीरामाच्या हाती धनुष्य शोभते, पण राजकीय स्वार्थासाठी धनुष्यबाणाचा सौदा झाल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी धनुष्यबाणाचे तेज फिके पडले आहे. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या निमित्ताने अचानक अशी दंगल का उसळावी? हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे? अशा दंगलबाज टोळ्यांना हवा देऊन राजकारणी मंडळी शहरे व गावे जाळत असतात”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून टीकास्र सोडण्यात आलं आहे.
“मुख्यमंत्र्यांना भोपळ्याइतकाही पाठिंबा नाही”
“डॉ. मिंधे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत अधोगतीस जात आहे. लोकांचा त्यांना भोपळ्याइतकाही पाठिंबा नाही. त्यामुळे दंगलींचा आधार घेऊन ते स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानून घेत आहेत. हा महाराष्ट्र धर्माचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. हे असे करून कोणी राजकीय भाकऱ्या शेकत असेल तर ते राज्य बुडवायला निघाले आहेत”, अशी टीका ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आली आहे.
“दंगली घडवण्याचे काम देणारी राजकीय फॅक्टरी”
“हाताला काम नसलेल्यांना दंगली घडविण्याचे काम देणारी राजकीय फॅक्टरी गेल्या सात-आठ वर्षांपासून देशात सुरू झाली आहे व प्रभू श्रीरामांच्या नावाने दंगली घडवून वातावरण पेटवा अशी योजना आहे. आठ दिवसांपूर्वीच मुंबईसह महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा, रथयात्रा निघाल्या. त्या शोभायात्रा मुसलमानांच्या मोहल्ल्यांतूनही गेल्या. त्या शोभायात्रांवर कोणी दगड मारले नाहीत व त्या शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी मशिदीवर पेट्रोल बॉम्ब फेकले नाहीत. मग हे सर्व पुढच्या आठ दिवसांनी आलेल्या रामनवमीच्या शोभायात्रेतच का घडले? हा संशोधनाचा विषय आहे”, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
“…तेव्हा अजित पवारांचा फोटो जाळण्यासाठी आव्हाडांनी फोन केला”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
“गुजरात व महाराष्ट्रात भाजपचे राज्य आहे. तरीही अशा दंगली होत आहेत. अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्व काही शांततेत सुरू असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.