गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या एका कथित व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या एका रॅलीमधला हा व्हिडीओ असून त्यात शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी आक्षेपार्ह कृती केल्याचा दावा सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. विरोधकांकडूनही त्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील त्यांच्या 'रोखठोक' सदरातून महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओचाही त्यांनी उल्लेख केला आहे. "हा सगळाच नाटू-नाटूचा प्रकार" "महाराष्ट्रात ‘चुंबना’वर चर्चा सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. देशात ईडी, सीबीआयने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गौतम अदानीच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यावर पाणी टाकण्यासाठी विरोधकांच्या घरांवर धाडी व अटका सुरू आहेत. सगळाच ‘नाटू नाटू’चा प्रकार", अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. किरीट सोमय्यांनाही 'तो' न्याय का नाही? संजय राऊतांनी किरीट सोमय्यांनाही लक्ष्य केलं आहे. ‘क्राऊड फंडिंग’ व त्या पैशांचा गैरव्यवहार हा मनी लाँडरिंग कायद्याच्या अंतर्गत येणारा विषय. साकेत गोखले हा तृणमूल काँगेसचा प्रवक्ता सध्या याच गुन्ह्याखाली ‘ईडी’च्या अटकेत आहे व चार महिने उलटले तरी त्याला जामीन मिळत नाही. किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत युद्धनौका वाचवा’ या मोहिमेखाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात ‘क्राऊड फंडिंग’ केले व ते पैसे कुठे वापरले याचा हिशेब दिला नाही. मग साकेत गोखले यांनी जर क्राऊड फंडिंगचा गुन्हा केला, मग त्याच गुन्ह्याखाली किरीट सोमय्या मोकळे कसे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. “उद्धव ठाकरे अफझल खानासारखे आले” रामदास कदमांचा टोला, म्हणाले “त्यांना उत्तर देण्यासाठी…” "महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून अटका झाल्या. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय?" असा प्रश्नही संजय राऊतांनी शिंदे सरकारला विचारला आहे. "महाराष्ट्र सरकारला कधीपासून चुंबनाचं वावडं?" "संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? श्री. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे", असा उपरोधिक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.