नवाब मलिक सातत्याने आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिवाळीनंतर राज्यात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव टाकरेंनी बारामतीमधल्या इन्क्युबेशन सेंटरच्या उद्धाटनाला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना खोचक शब्दांमध्ये टोलेबाजी केली. तसेच, फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्याचा देखील समाचार घेत त्यावर टोमणा मारला.

पवार कुटुंबियांवर स्तुतिसुमनं

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात पवार कुटुंबीयांचं कौतुक केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “५० वर्षांपूर्वीची बारामती आपल्याला माहिती आहे काय होती. पवार साहेबांनी दगडालाही पाझर फोडून दाखवला. परदेशात जाऊन तिथल्या गोष्टी माझ्याकडे झाल्याच पाहिजेत आणि ते मी करणार, ही वृत्ती असायला हवी”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शुभेच्छांमधून लगावला टोला

आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी जाताजाता आभार मानताना देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “मला इथे येण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणतायत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही करोना तसा गेलेला नाही. सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारणातलं इन्क्युबेशन सेंटर

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली. “जिद्द हवी. बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आलं. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं २५-३० वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

आम्ही २५-३० वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली”, बारामतीत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!

पुण्यानंतर बारामती केंद्र!

यावेळी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या एका विधानाचा संदर्भ देताच व्यासपीठावर बसलेल्या अजितदादांनी त्यांना हटकलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “मला येताना अजित पवार म्हणाले की बारामती हे आता पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं केंद्र बनेल”, तेवढ्यात अजित पवारांनी त्यांना हटकून “शिक्षणाचं” अशी मिश्किल सुधारणा सुचवली! यावरून सभागृहात हशा पिकताच मुख्यमंत्री म्हणाले, “हो शिक्षणाचं. राजकारणाचंही आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. आपण आपले मिळून धडा शिकवण्याचं काम करू”!