उद्धव ठाकरे यांचा निरोप समारंभ आज विधानपरिषदेत पार पडला. उद्धव ठाकरेंसह ९ जणांचा निरोप समारंभ आज पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. तर उद्धव ठाकरेंनीही विविध कविता करत, शेर वाचत आपलं भाषण गाजवलं. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीची तुलना ही आयपीएलशी केली. इंडियन पॉलिटिकल लीग आहे का? असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.
इंडियन पॉलिटिकल लीग आहे का?
“मला वाटतं सध्या जे काही वातावरण देशात आणि राज्यात आहे ती संभ्रमावस्था आहे. कोण कोणाबरोबर आहे तेच कळत नाही. आपण म्हणतो हा आपला होता ना? मग सांगितलं जातं नाही तो त्या टीममध्ये आहे. हा आपला होता ना, नाही तो तिकडे गेला आहे. इंडियन पॉलिटिकल लीग झाली आहे का? कोण कुठे आहे तेच कळत नाही. एकच संघ मजबूत होत चालला आहे. मॅच खेळायलाही बाकीचे संघ हवेत ना? की नको? सगळेच संघ संपवले तर मॅच कुणाशी खेळणार? हा पण विचार केला पाहिजे. सगळे खेळाडू तुमच्याच संघात घेतले तर काय करणार? ” असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
उत्तरायण, दक्षिणायन होतं तेव्हा सूर्याची पूर्व दिशाही बदलते-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे आपल्या निरोपाच्या भाषणात पुढे म्हणाले, “जनतेला वाटतं आहे की राजकारणासाठी हे लोक काहीही करु शकतात. पण आपल्यासाठी काहीतरी करु शकतात हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे. ही संधी सगळ्यांना मिळत नाही. ज्यांना मिळते त्यांनी त्यांचा उपयोग करायला पाहिजे. ठीक आहे, दिवस येतात, दिवस निघून जातात. काळ येतो, काळ बदलतो. आपल्याला धीर धरला पाहिजे, संयम बाळगला पाहिजे. सूर्य पूर्वेला उगवतो असं आपण म्हणतो पण उत्तरायण आणि दक्षिणायन होतं तेव्हा ती पूर्वही बदलते. आपण प्रवाहासह, लाटेसह वाहात जायचं की ठामपणे थांबून प्रवाह योग्य दिशेने वळवायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. जे लाटेबरोबर वाहात जातात त्यांच्यासाठी विंदा करंदीकर यांनी फार छान ओळी लिहिल्या आहेत. ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा? हे जरा समजून घे. या गोष्टी त्यांनी खूप छान लिहिल्या आहेत. अनेक कवींनी, विचारवंतांनी छान गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यातलं थोडं तरी आपण घेतलं पाहिजे. “
