महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक घणाघाती मुलाखत २६ आणि २७ जुलै या दोन दिवशी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेच ही मुलाखत घेणार आहेत. त्याचा टिझर रिलिज झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून जे म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला त्यावरही भाष्य केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटर पेजवर या मुलाखतीचा पहिला टिझर आला आहे. जो चांगलाच चर्चेत आहे. तुमच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेलं.. असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे "सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं." असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे, त्यांनी केलेलं बंड, देवेंद्र फडणवीस भाजपा, राष्ट्रवादीतलं बंड या सगळ्यावर भाष्य करणार हे उघड आहे. २१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. एकनाथ शिंदेंसह सुरुवातीला १६ आमदार नॉट रिचेबल झाले त्यानंतर ही संख्या ४० झाली. यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने मविआ सरकार कोसळलं. त्यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागच्या एक वर्षात घडलेल्या या सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे हे भाष्य करणार हेच हा टिझर सांगतो आहे. वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत! "आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!" असं शीर्षक या टिझरला देण्यात आलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. आणखी काय काय म्हणत आहेत उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यावर विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणतात "मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? की तुम्ही राष्ट्रवादी तोडलीत." "उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाही" हे वाक्य उच्चारत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरही टीका केली आहे. निवडणूक आयोग शिवसेनेची आत्या लागत नाही असाही टोमणा त्यांनी लगावला आहे. लोकशाही कोण वाचवणार? या संजय राऊत यांच्या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे लोकशाही साधा माणूस वाचवणार. बाबरी आणि राम मंदिराच्या प्रश्नावरही उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहेत. "ज्यांनी बाबरीची जबाबदारी घेतली नाही ते राम मंदिराचं श्रेय कसं काय घेऊ शकतात?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. देशावर जो प्रेम करतो, देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू. माझा देश माझा परिवार आहे हेच माझं हिंदुत्व आहे. आज माझ्या विरुद्ध अख्खा भाजपा आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे फक्त व्यक्ती नाही, उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. ही सगळी वाक्यंही उद्धव ठाकरे या मुलाखतीच्या टिझरमध्ये बोलताना दिसत आहेत. मला संपवायचं असेल तर चला संपवा, माझ्या वडिलांचे विचार, माझ्या जनतेची साथ सोबत आणि तुमची ताकद बघू काय होतं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.