…मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

“मुख्यमंत्र्यांनी हे कबूल केलं ते बरं झालं”

uddhav thackeray live
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. (संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थिती १५ दिवसांच्या कडक निर्बंधांनंतरही फारशी सुधारणा झाल्याचं दिसून, आल्यानंतर राज्याने कडक निर्बंध १५ दिवसांसाठी वाढवले आहेत. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या संवादातील काही मुद्द्यांवर बोट ठेवत आता भाजपाने पलटवार केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी काही मुद्द्यांवरून सवाल केले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “करोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होती, असे मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं, पण त्या लाटेचा सामना करण्यासाठी मधल्या पाच महिन्यात राज्य सरकारनं काय तयारी केली हे सांगितले नाही. रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत व ते काही दिवसात सुरू होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण हा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती, तर गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते, तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती. शुक्रवारच्या संबोधनात त्यांनी केंद्राने ऑक्सिजनचा पाचशे मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केलं ते बरं झालं. राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी मान्य केले हे सुद्धा चांगले झालं,” असं पाटील म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, करोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. करोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केला. “महाराष्ट्र राज्य १८ ते ४४ वयोगटासाठी १२ कोटी लशी एक रकमी विकत घेण्यास तयार आहे, असं त्यांनी सांगितले. केंद्राने राज्य सरकारांना लशीची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नव्हती. लशीच्या उत्पादन व पुरवठ्याला मर्यादा आहे. त्यामुळे जशी लस उपलब्ध होईल, तशी दिली जाईल, असं मुख्यमंत्री आता सांगतात आणि तरुणांना केवळ नोंदणीनंतर संदेश आल्यानंतरच लसीकरणाला जा असंही सांगतात. त्यांनी अशीच जाणीव ठेवून ४५ पेक्षा अधिकच्या वयाच्या नागरिकांच्या लसीकरणात शिस्त ठेवली असती, तर गेले काही दिवस राज्यात जो लसीकरणाचा गोंधळ चालू आहे, तो झाला नसता आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात मनस्ताप सहन करावा लागला नसता,” असं पाटील म्हणाले.

“राज्यात लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढविल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या रोजगाराचे नुकसान होणार आहे, ते ध्यानात घेता मुख्यमंत्री शुक्रवारी काही वाढीव पॅकेज जाहीर करतील, असं वाटलं होतं पण त्यांनी निराशा केली. आधीच्या पॅकेजच्या अंमलबजावणीची त्यांनी दिलेली माहितीसुद्धा समाधानकारक नाही,” अशी टीका पाटील यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uddhav thackeray live chandrakant patil maharashtra covid 19 crisis maharashtra lockdown bmh

ताज्या बातम्या