scorecardresearch

VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी व भावना गवळी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला. “आपल्या पलिकडच्या ताईंना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक करण्यात आली आणि मग मोठ्या हुशार ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांच्यावर केला. तसेच मोदींना राखी बांधल्यानंतर गवळींवरील ईडी-सीबीआय कारवाई थांबली, असंही नमूद केलं. ते शनिवारी (२६ नोव्हेंबर) बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. त्या आपल्या ताई होत्या आणि आहेत. आपणच त्यांना दोनदा, चारदा, पाचदा कितीवेळा खासदार केलं हे तुम्हाला माहिती आहे. इथल्या गद्दार आमदारांनाही शिवसैनिकांनीच राबराब राबून निवडून आणलं आणि खासदार केलं होतं. मात्र, या ताईंना धमक्या देण्यात आल्या.”

“खास मुंबईहून इकडे ताईंकडे दलाल पाठवले जायचे”

“खास मुंबईहून इकडे ताईंकडे दलाल पाठवले जायचे. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

“मोदींना राखी बांधणाऱ्या ताईंवर कारवाईची ईडी-सीबीआयवामध्ये हिंमत आहे का?”

“तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? त्या तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळालं. हे सर्व आणि ही तुमची चालुगिरी लोक बघत आहेत,” असं म्हणत ठाकरेंनी भावना गवळींवर टीका केली.

व्हिडीओ पाहा :

“आजचा भाजपा पक्ष आयात पक्ष झालाय”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपणही २५-३० वर्षे भाजपाबरोबर होतो. मात्र, आजचा भाजपा पक्ष आयात पक्ष झालाय. विचार संपले, नेते संपले, भाकड पक्ष झाला आहे. तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फक्त यादी काढा आणि त्यात बाहेरून यांच्या पक्षात आयात केलेले किती लोक आहेत हे पाहा. त्यामुळे हा आयात पक्ष झाला आहे.”

हेही वाचा : VIDEO: “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

“अरे हा पक्ष आहे की चोरबाजार?”

“या आयात पक्षाची सुरू असलेली दादागिरी, हुकुमशाही आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही का? अरे हा पक्ष आहे की चोरबाजार? त्यांच्याकडे स्वतःकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. ते बाहेरून चोरून इतरांचे नेते घेत आहेत आणि आपल्याविरोधात त्यांना उभे करत आहेत.

“४० गद्दारांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही सांगावं”

“तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही,” असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील बंडखोरांना दिलं.

हेही वाचा : VIDEO: “त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही, कारण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

“गद्दारांना चेहरा बाळासाहेबांचा आणि आशीर्वाद मोदींचा हवाय”

“त्यांना नाव बाळासाहेब ठाकरेंचं हवं, चेहरा बाळासाहेबांचा हवा, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे. मग त्यांची मेहनत कोठे आहे?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 20:33 IST

संबंधित बातम्या