संगमनेर : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणताही समन्वय नाही. प्रत्येकाला मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले आहे. स्वयंघोषित मुख्यमंत्री राज्यात वाढले आहेत. उद्धव ठाकरे राज्यातील काँग्रेस नेत्यांना बाजूला ठेवून थेट दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना भेटतात हे आश्चर्यकारक असल्याचे उद्गार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले. दरम्यान निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून उद्यापासून दुष्काळी भागासाठी पाणी सोडण्याची घोषणा त्यांनी एका कार्यक्रमात केली.

आज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मंत्री विखे संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील झालेल्या एका कार्यक्रमात भंडारदरा आणि निळवंड्यातून ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यांना उद्यापासून सोडणार आहे. निमगाव भोजापूर चारीच्या साफसफाईचे काम झाले तर त्यातूनही लवकरच पाणी सोडले जाईल असे सांगितले. त्यानंतर महसूल पंधरवडा निमित्ताने संगमनेरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, उद्धव ठाकरे राज्यातील काँग्रेस नेत्यांना बाजूला ठेवून थेट केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांना भेटतात याचे आश्चर्य वाटते. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना आता मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. महायुतीच्या योजनेच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते न्यायालयात गेले. पण न्यायालयानेसुद्धा त्यांना चपराक देवून सरकारच्या योजनेला आणि राज्यातील भगिनींना न्याय दिला. एकीकडे न्यायालयात जायचे आणि दुसरीकडे योजनांचे फाॅर्म भरून घेण्यासाठी धावपळ करायची हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा लोकांनी ओळखला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नगर जिल्ह्यातील सहा लाख महिलांनी अर्ज दाखल केले केले असून संगमनेर तालुक्यात ८० हजार ४१४ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

हेही वाचा – कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाची मंजुरी

हेही वाचा – Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात आणखी एक गुन्हा; लेकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घातलेला वाद अंगाशी!

संगमनेर तालुका दत्तक घेणार

महायुती सरकारकडून एकट्या संगमनेर तालुक्यात ४७३ कोटी रुपयांचा निधी योजना आणि विकास प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही तालुक्याच्या विकास कामांना निधी कमी पडणार नाही. संगमनेर तालुका विकासासाठी आता आपण दतक घेणार आहोत. – राधाकृष्ण विखे, महसूल तथा पालकमंत्री.