BJP Criticized Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली आहे. राहुल गांधी , मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल यांचीही उपस्थिती यावेळी होती. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीत आहेत. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची भेट उद्धव ठाकरेंनी घेतली तेव्हा संजय राऊत आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. भाजपाने ( BJP ) उद्धव ठाकरेंवर टीका केली. महाराष्ट्रात लवकरच होणार निवडणूक महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीला देशभरात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम यश मिळालं. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय होणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशात भाजपाचे ( BJP ) प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. काय आहे केशव उपाध्येंची पोस्ट? स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरेंकडे आणि शिवसेना उबाठा कडे बघावं. २५ वर्षे भारतीय जनता पक्षासोबत ( BJP ) वैचारिक तत्वांवर आधारलेली युती, जी प्रत्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी अस्तित्वात आणली होती. भाजपासह लढताना १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी राहुल गांधींची भेट घेतली. (फोटो सौजन्य-उद्धव ठाकरे, एक्स अकाऊंट) दिल्लीपुढे झुकत नाही असं म्हणून डरकाळ्या फोडणारे. (BJP) दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत. ज्या अमित शहांची तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्री वर चर्चेसाठी आले व, योग्य तो सन्मान दिला. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही. ज्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजप ( BJP ) सोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं. शिवसेना उबाठाची दिल्लीवारी; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट आता ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्विकारले असे उद्धव ठाकरे सांगत होते, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रिपदासाठी घेत नाहीये. एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या जायच्या, जे जागा वाटप करण्याचे सूत्र ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहेत. असंही BJP चे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. या टीकेला आता उद्धव ठाकरे उत्तर देणार का? किंवा जे मुद्दे केशव उपाध्ये यांनी मांडले आहेत त्यावर विचार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.