“यापेक्षा जास्त मतं जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील,” ‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ ठरलेल्या ठाकरेंना भाजपा नेत्याचा टोला

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कमागिरीसंदर्भात जनतेचं मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं ज्यात मुख्यमंत्र्यांना पसंती मिळाली

uddhav thackeray
सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेल्या उद्धव ठाकरेंची तुलना 'कोणत्याही जिमखान्याच्या अध्यक्षा'सोबत केलीय. (फाइल फोटो, ट्विटरवरुन साभार)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये आघाडीवर असल्याचं एका सर्वेक्षणामधून समोर आलं आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या निकालानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत या सर्वेक्षणातील सॅम्पल साईजवरुन टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेल्या उद्धव ठाकरेंची तुलना ‘कोणत्याही जिमखान्याच्या अध्यक्षा’सोबत केलीय.

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कमागिरीसंदर्भात जनतेचं मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाबद्दल आपण समाधानी असून पुन्हा त्यांना मतदान करु असं म्हणणाऱ्यांची संख्या ४९ टक्के इतकी आहे. मात्र या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले लोक आणि ज्या राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यावरुन निलेश राणेंनी एक ट्विट केलं आहे.

नक्की वाचा >> …म्हणून मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही; पवारांचं सूचक वक्तव्य

“१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली (आहेत.) भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. महाराष्ट्रात जवळपास ११.५ कोटी (लोक राहतात) आणि (देशात एकूण) राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील,” असं निलेश राणेंनी या सर्वेक्षणामधील सॅम्पल साइजच्या आकडेवारीची माहिती शेअर करत म्हटलं आहे.

देशातील मुख्यमंत्र्यांसंदर्भात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांनी सहभाग नोंदवला होता. त्यावरुनच राणेंनी टोला लगावला आहे.

सर्वेक्षणाची आकडेवारी काय सांगते?

प्रश्नमने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेक्षणाचे रेटिंग जाहीर केले आहे. पहिल्या फेरीत १३ ज्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्यांचा समावेश आहे. अलीकडेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या निवडणुका झालेल्या राज्यांची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली नसल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. या राज्यांमधील मुख्यमंत्री अजून स्थिर होत आहेत. या राज्यात कोणतेही पॅनेल नसल्यामुळे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात सध्या सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. या राज्यांचा पुढील टप्प्यात समावेश करण्यात येईल असं संस्थेनं म्हटलं आहे.

टॉप तीनमध्ये कोण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आम्ही त्यांना पुन्हा निवडून देऊ असं महाराष्ट्रातून सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या मतदारांनी (४९ टक्के) म्हटलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही ४४ टक्के मतांनी पसंती दर्शवल्याने ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. ४० टक्के मतदारांनी गहलोत यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uddhav thackeray most popular chief minister nilesh rane questions survey sample size scsg

ताज्या बातम्या