Uddhav Thackeray on Eknath shinde : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या ईव्हीएम घोटाळ्यावरून आत्मक्लेष उपोषण पुण्यात पुकारलं आहे. लाडकी बहीणसारख्या योजना, पैशांचा पाऊस आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला जाब विचारत गेल्या तीन दिवसांपासून वयाच्या ९५ व्या वर्षी उपोषण केलं. बाब आढावांची भेट घेण्याकरता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आज पुण्यात दाखल झाले. पुण्यात गेल्यानतंर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
दिल्लीतील बैठक आटोपून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट साताऱ्यातील दरे या गावी. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते गावी गेले असल्याचं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तिथे गेल्यापासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. “राक्षसी बहुमत मिळाल्यानतंर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? त्यांनी राजभवनात जायला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> बाबा आढावांच्या बाजूलाच बसून अजित पवारांनी ईव्हीएमवर मांडली भूमिका; म्हणाले, “लोकसभेवेळी आम्ही…”
राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जातात?
j
“आम्हीही गेलो होतो. आम्ही एकमेकांविरोधात लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागली होती. आता विधानसभेची मुदत संपलेली असताना राष्ट्रपती राजवट का लागली नाही. या सर्व प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. एवढं बहुमत मिळाल्यावरसुद्धा लोक राजभवनात जाण्यऐवजी शेतात का जातात? अमावस्येचा मुहुर्त का घेतात? मुख्मयंत्री कोण होणार? मंत्रिमंडळात कोण येणार? याबाबत काहीच तयारी नव्हती. सर्व वाटपाबाबत आता वेळ लागतोय”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला असं वाटतंय की मुद्दाम आम्ही करतोय ते बरोबर करतोय हे सांगणारं कोणीतरी वडिलधारं असावं लागतं. ते काम तुम्ही केलंय. पण आता तुम्ही आत्मक्लेश करू नका. हा आत्मक्लेश अख्ख्या महाराष्ट्राचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाबा आढाव यांचं उपोषण सोडलं.
अजित पवारांनीही दिली भेट
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्हाला त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करता येत नाही”.