“सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली”; कृषी कायदे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

uddhav thackeray

कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते कायदे मागे घेतल्याचा निर्णय आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं असून भाजपा नेते मात्र या निर्णयावर नाराज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले, “शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो”.

हेही वाचा – कृषी कायदे मागे घेताना काय म्हणाले पंतप्रधान मोदी? जाणून घ्या सविस्तर…

मुख्यमंत्री म्हणाले, “आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे”.

या निर्णयानंतर मोदी सरकारकडून आपल्या असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uddhav thackeray on pm modi decision about repelling farm laws vsk

ताज्या बातम्या