Uddhav Thackeray on Shivsena Congress Merger Rumors: शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मेळावे घेतले. शिवसेनेच्या (ठाकरे) सहा खासदारांनी बंडखोरीचे संकेत दिल्यामुळे यंदाच्या वर्धापनदिनाला वेगळेच वलय निर्माण झाले होते. दोन्ही गट एकमेकांवर काय टीका-टिप्पणी करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यातच ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेना विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही

काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाही. तर मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या न्याय हक्कासाठी आणि रक्षणासाठी जन्माला आलेली आहे. काँग्रेसनेही आपल्याला छळलेच होते. आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य काँग्रेसबरोबरच्या शत्रुत्वात गेले आहे. आपले टोकाचे वैर होते.”

निवडणुकीच्या निकालाशी तुलना करून आपण फसलो

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या ६० वर्षांतील प्रवासात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे स्मरण केले. ते म्हणाले, “शिवसेनेसाठी अनेकांनी बलिदान दिले, तुरुंगवास भोगला, रक्ताचे पाणी केले. त्यातले काही जण आज आपल्यात आहेत, काही जण नाहीत. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. शिवसेनाप्रमुखांसह जी पहिली फळी होती, त्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच शिवसेना कानाकोपऱ्यात पसरली.”

शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक संकटे आली. आज आलेले संकट त्यासमोर काहीच नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “ज्यावेळी आपण आपल्या यश-अपयशाची तुलना निवडणुकीच्या निकालाशी करायला लागलो, त्यावेळी आपण फसलो”, असे विधान यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी आणीबाणीच्या काळातील आठवण सांगताना रजनी पटेल यांचा किस्सा सांगितला. त्यावेळी रजनी पटेल शिवसेनेच्या मुळावर उठले होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना एक पत्र देऊन त्यावर स्वाक्षरी करण्याची धमकी दिली होती. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा, अशा आशयाचे ते पत्र होते. आजही काही जण बोंबलत आहेत की, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार. पण आम्ही ३० वर्ष भाजपाबरोबर राहून भाजपात विलीन नाही झालो. तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विषय साफ चुकीचा असल्याचे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. उलट भाजपाच आता शिंदे सेनेत सामील होईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ठाकरे म्हणाले.

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या आरोपांचा समाचार

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना ठाकरे गट सोडण्याचे कारण सांगितले. उद्धव ठाकरे प्रचारासाठी प्रकृती ठिक नसल्याने येत नाहीत. पण निदान आदित्य ठाकरेंनी तरी फिरायला हवे, असे निंबाळकर म्हणाले.

या विधानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी भेटत नाही, फिरत नाही, असे म्हटले गेले. मग मी जर प्रचाराला येत नव्हतो, तर तू (निंबाळकर) निवडून कसा आलास? लोकसभेच्या प्रचारासाठी मी प्रत्येक मतदारसंघात अनेक सभा घेतल्या होत्या. तेव्हा हे लोक निवडून आले.”

ऑपरेशन कमळ राबवावे लागेल – उद्धव ठाकरे

शिवसेनेचे (ठाकरे) सहा खासदार फोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिल्याचे बोलले जात आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली.

“ज्या पद्धतीने देशाचे राजकारण चालले आहे जनतेचा विश्वास उडत चालला आहे. सोशल मीडियावर एक मिम व्हायरल होत आहे. सोने चोराला पोलिसांनी पकडल्यानंतर तो सांगतो साहेब चोरी म्हणू नका, ‘ऑपरेशन गोल्ड’ म्हणा. डॉक्टरही आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. हे असे होणार असेल तर तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ करावs लागेल. देश अराजकाच्या दिशेने चालला आहे”, असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.