Sanjay Nirupam Ubatha Shivsena split: “नेते आणि कार्यकर्ते हळुहळू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास गमावत आहेत, ठाकरेंची शिवसेना २०२९ पर्यंत संपेल”, असे वक्तव्य शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केले. राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु असून, ठाकरे सेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर निरुपम यांनी भाष्य करताना उद्धव ठाकरेंची शिवसेना हळुहळू समाप्त होत असल्याचे मत व्यक्त केले.

२०२९ पर्यंत उबाठा पक्ष संपेल – निरुपम

“उबाठा पक्ष हळुहळू समाप्त होत आहे. त्यांच्या आमदार आणि खासदारांचा आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. २०२९ पर्यंत हा पक्ष संपेल. त्यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते दररोज पक्ष सोडत आहेत. उबाठा खासदारांचा विचार करता आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण, हा पक्ष हळुहळू संपेल आणि लोक त्यांची साथ सोडतील”, असे संजय निरुपम एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. ऑपरेशन टायगरवर बोलताना निरुपम यांनी नेते आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंवर विश्वास राहिला नसल्याचे नमूद केले.

मंत्री आशिष जैसवाल काय म्हणाले?

मंत्री आशिष जैसवाल यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर थेट भाष्य करण्यास टाळले पण, खासदारांचा पक्षप्रवेश झाल्यानंतरच यावर भाष्य करणे उचित ठरेल असे जैसवाल म्हणाले. “उबाठा पक्षात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करणे मी योग्य समजत नाही. बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे चालवत आहेत असं त्यांना वाटत असेल आणि त्यांना त्यांचा मतदारसंघ आणि राजकीय भविष्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतला तरच यावर काही भाष्य करणे योग्य ठरु शकते. इतिहास, पक्षांतराचे नियम आणि आकड्यांचे गणित याचा विचार करुन ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल”, असे जैसवाल म्हणाले. उबाठांचे ९ पैकी ७ खासदार शिंदेसेनेत जाणार अशी माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

संजय राऊतांनी दाव्यांचे केले खंडन

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या दाव्यांचे खंडन केले आहे. “हे सगळे दावे खोटे आहेत. आमच्याकडे अशी कुठलीही माहिती नाही. चार दिवसांपूर्वी सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला हजेरी लावली होती. आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. खासदारांनी त्यांच्या कुटुंबीयांची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याची शपथ घेतली आहे”, असे संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. तसेच, त्यांचा पक्ष प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन लांडगा सुरु करेल, अशी टीका त्यांनी केली.