राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी २६ जून रोजी एकाच विमानाने मुंबई ते नागपूर असा प्रवास केला होता. या विमान प्रवासाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं. या विमान प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही राजकीय चर्चा झाली का? यावरूनही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज (२८ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या विमान प्रवासाचा उल्लेख करत एक मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची परभणीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्याच बॉसकडून पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचा मोठा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस हे विमान प्रवासादरम्यान मला हतबल वाटले, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परवा माझ्याबरोबर विमानात होते. पण यावेळी देवेंद्र फडणवीस मला हतबल दिसून येत होते. म्हणजे कळत नव्हतं की हे मुख्यमंत्री आहेत, पण तरीही हतबल का झालेत? आत्मविश्वास गमावलेला माणूस दिसत होते. कारण त्यांनाही हे कळतंय की आपले पंख कापले जात आहेत आणि पंख कापणारे हे आपलेच बॉस आहेत. मग आपण करायचं काय? न्याय कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोठवायचं? कारण दार उघडलं की पंख कापणार, म्हणजे जे काही वाचले ते वाचून जेवढे दिवस आहेत ते ढकललेले बरे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आहेत”, असा मोठा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण?. शेवटी सर्वांनाच महत्वकांक्षा असतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर? जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरीही शर्यतीत होते की नव्हते? नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते आणि ते पुन्हा अध्यक्ष होत होते. मात्र, जर ते पुन्हा अध्यक्ष झाले असते, तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. त्यामुळे नितीन गडकरी यांचे पंख असे कापले की त्यांच्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं. आता बिचारे नितीन गडकरी काय करू शकतात? आता नितीन गडकरी काहीच करू शकत नाहीत”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
