Uddhav Thackeray Speech : महिला आरक्षण विधेयकावरून घमासान सुरू असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीकास्र डागलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. ते भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
“दत्ता साळवींचं नाव मूर्तिमंत उदाहरण म्हणून घेतोय. १९६६ साली शिवसेनेची सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा झंझावात सुरू होता. आम्ही तेव्हा दादरला राहायचो. एकदिवस दरवाजाची बेल वाजली. दार उघडल्यावर एक तगडा, कुरळे केस असलेला माणूस दारात उभा होता. ते दत्ता साळवी होते. अमरहिंद व्याख्यानमालेतील बाळासाहेबांचं भाषण ऐकून ते नोकरीचा राजीनामा देऊन आमच्याकडे काम करायला आले होते. ते गिरणीमध्ये जॉबर होते. ज्याने स्वतःची नोकरी सोडून अंधारात उडी मारली, त्यांनी लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड मिळवून दिला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आज एकूणच सगळी वखवख सुरू आहे. सगळं मलाच पाहिजे. सगळं काही मलाच पाहिजे. कोणाला असं वाटत असेल की तिथे जाऊन काही मिळतंय तर जरुर जा. पण तिथे गेलेल्यांचे अनुभव आधी विचारा.” यावेळी त्यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबाबतही भाष्य केलं. लोकसत्तामधल अग्रलेख आणि रविश कुमार यांचे व्हिडिओ पाहण्याचेही त्यांनी सल्ले दिले.
बंगालमध्ये एकटी महिला वाघिणीसारखी लढतेय
ते पुढे म्हणाले, पश्चिम” बंगालमध्ये एकटी महिला वाघिणीसारखी लढतेय, त्या जिंकल्याच पाहिजेत. त्या एका महिलेला हरवण्यासाठी २ लाखांवर सीआरपीएफ उतरवले गेले आहेत. जेव्हा मणिपूर जळत होतं, तेव्हा ३० हजार जवान होते. पण पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत तेव्हा तिकडे दोन काय पाच लाखाच्या घरात जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदान करणार कसं? कोण करणार? नाक्या-नाक्यावर फौजा आहेत. मग कोणाची हिंमत आहे मतदानाची? असंही ते म्हणाले.
ही लोकशाही आहे का?
“जर ममता बॅनर्जी हरल्या तर तिथं जिंकण्याचे क्रेडिट हे घेतील. ही लोकशाही आहे? योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री बंगालमध्ये. या राज्यात मात्र ड्रग्जचे रॅकेट सुरू आहे. भोंदूगिरी सुरू आहे. महिलांचे शोषण सुरू आहे. पण आम्हाला त्याचे काही नाही. महाराष्ट्र जिंकला, मग बंगाल जिंकायचा, मग आसाम, मग इतर राज्य हेच सुरू आहे. उत्तर प्रदेशात कामगारांनी मोर्चा काढला. पण त्यांच्यावर पाकिस्तानी असल्याचा आरोप करण्यात आला. पहलगाम हल्ला होऊन एक वर्ष होत आले, पण हे अतिरेकी कुठून आले होते, हे सरकारला कळलं नाही, पण कामगार पाकिस्तानी आहेत, असा आरोप करण्यात आला, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केली.
