Uddhav and Raj Thackeray Morcha Against Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी आज गर्जना मोर्चाचे आयोजन केलं. हा मोर्चा मेट्रो सिनेमा येथून सुरू होऊन मुंबई महापालिका मुख्यालय इथपर्यंत होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भर उन्हातून या मोर्चात सामील झाले. त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर विराट सभा घेऊन उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सराकरवर टीका केली आणि एसआयआर रद्द करण्याची मागणी केली.

राज ठाकरे काय म्हणाले?

मी २०१७ ते २०१८ पासून मी सांगत होतो, की मतचोरी होते आहे. सोनिया गांधी असोत, ममता बॅनर्जी असोत मी सगळ्यांची भेट घेतली होती. निवडणुकांवर बहिष्कार टाका, कारण तोपर्यंत पारदर्शक कारभार होणार नाही. अशा पद्धतीने मतं कमी होऊ शकत नाहीत आणि मतं अशी वाढू शकत नाहीत. मी हा दावा केला होता की मतचोरी होते आहे असं राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे. मी जे तेव्हा म्हणत होतो ते आत्ता सगळ्यांना म्हणत होतो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळालं. महाराष्ट्रात काय सन्नाटा, जल्लोष नाही. असा कुठला विजय असतो? जिथे विजय मिळाल्यानंतर लोकांमध्ये उत्साह किंवा जल्लोष नसतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक पार पडली होती. त्यात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असा कुठला व्हायग्रा आहे की दणादण मतदार वाढले? असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला.

मला सत्ताधारी पक्षाला एकच सांगायचं आहे की आम्हाला कुठलाही राग नाही किंवा आसूया नाही. तुम्ही सत्ता कशी राबवता आहात आणि कशातून राबवत आहात त्याचा आम्हाला राग आहे. लोकांनी ठरवावं की कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला विरोधात. लोकांनी ठरवलं पाहिजे, निवडणूक आयोगाने नाही. सध्या मनमानी कारभार सुरू आहे, एकाच उद्योगपतीला विमानतळं दिली, जंगलं दिली, पोर्ट दिले. काय चाललंय काय? आम्ही काही केलं तरी फरक पडत नाही हे निवडणूक आयोगाला बांधल्यामुळे होतं आहे. या देशातल्या जनतेने काहीही बोलावं, काहीही सांगावं, निवडणूक आयोग आमच्यासह असेल तर आम्ही मनाला येईल तसं वागू. आम्हाला अमेरिकेला सरेंडर व्हायचं आहे तर होऊ, पेट्रोलचे भाव वाढवू, तुम्हाला रांगेत उभं करू. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असतो तेव्हा त्यांना भीती असते. लोकांनी मतदान केलं नाही तर आपली सत्ता जाईल, अशी कुठलीही भीती महाराष्ट्रातही नाही, केंद्रातही नाही कुठेही दिसत नाही असंही राज ठाकरे म्हणाले. यांच्या काळात फक्त एक उद्योगपती मोठा होताना दिसतो आहे. ही हिंमत आली कुठून? सगळी चॅनल्स आम्ही ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन ठेवला आहे. सत्तेतल्या कुठल्याही पक्षाने विचार केला पाहिजे की आपलं आजचं चुकीचं पाऊल, धोरण हे पुढच्या काळात पायंडा होणार का?

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. पहिल्या प्रथम मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली होती. मेक इन इंडिया आपल्या देशात हुकुमशाहाही बनणार असेल तर त्याला आपल्याच देशात गाडून टाकू. तुमची हुकुमशाही आम्ही गाडून टाकली असं समजा. सर्वांना विषय माहितेय, त्यात काही बारकावे आहेत. संपूर्ण देशात किती मतदार वगळले आहेत, हे माहितेय का? १३ कोटी मतदार अचानक वगळून टाकले आहेत. १३ कोटी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसंख्या वगळून टाकली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझा आक्षेप निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीलाच आहे. राष्ट्रपतींची निवडणूक होते, मग निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही, नेमणूक का होते. या कमिटीमध्ये पूर्वी पंतप्रधान, सरन्यायाधीश, विरोधी पक्ष नेते होते. यांनी यातून सरन्यायाधीश काढून टाकले, विरोधी पक्षनेता ठेवला. सरन्यायाधीशांच्या जागी पंतप्रधान म्हणतील तो मंत्री टाकला. मग तो मंत्री कोण तर अमित शाह सांगतील तो मंत्री. पहिल्या प्रथम, ज्ञानेश कुमारची नेमणूक पक्षपातीपणाने केली, असंही त्यांनी म्हटलं.

Live Updates

Thackeray Morcha Live Updates : ठाकरे बंधूंच्या मोर्चातील लाईव्ह अपडेट्स वाचा

13:04 (IST) 4 Oct 2026

VIDEO : "देश काय ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे?" उद्धव ठाकरेंची गर्जना

जे इथले स्थानिक पातळीवर वैध अवैध पातळीवर ठरवण्याचा अधिकार दिल्लीत आहे. बीएलओ वगैरे जाणार. ते ज्ञानेश कुमार ठरवणार? देश काय ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणाने केली आहे. ज्ञानेश कुमार उद्या निवृत्त झाले तरीही त्यांच्या वर कोणतीही कारवाई होणार नाही. ही कोणती लोकशाही आहे. जर पंतप्रधानांना तसं संरक्षण नसेल, तर ज्ञानेश कुमारांना का आहे. चोरी केलीस तरी काही नाही पोलीस आपलंच आहे. नेमणूक पक्षपातीपणने, शिवाय संरक्षणही आहे. हा मनमानीपणा सहन केला जाणार नाही.

12:58 (IST) 4 Oct 2026

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त राज ठाकरेंनी केल्या दोन प्रमुख मागण्या, गर्जना मोर्चात म्हणाले...

गर्जना मोर्चात राज ठाकरे यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं ते म्हणालेत. ...अधिक वाचा
12:41 (IST) 4 Oct 2026

...तर दूध का दूध पाणी का पाणी होईल - राज ठाकरे

२०१७,२०१८ पासून हा राज ठाकरे सांगत आला की यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळेला मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जींसहित अनेक नेत्यांना भेटलो होतो. ज्याप्रकारे निवडणूक आयोग मशिन्स, मतदार याद्यांमध्ये घोळ करत आहे, याविरोधात पाऊल उचललं पाहिजे. निवडणुकीवर बहिष्कार टाका असं आवाहनही केलं होतं. त्याशिवाय दूध का दूध पाणी का पाणी होणार नाही - राज ठाकरे

अशाप्रकारे मतं कमी होऊ शकत नाहीत आणि भाजपाचे मते वाढू शकत नाहीत. मी काय म्हणत होतो, हे आता समजायला लागलं आहे सर्वांना. अन्यथा असं होऊच शकत नाही. - राज ठाकरे

12:38 (IST) 4 Oct 2026

"ज्ञानेश कुमारांचं थोबाड लावून काय फिरताय?" राज ठाकरेंनी फटकारलं

चेहऱ्यावर ज्ञानेश कुमारांचं थबाड लावून काय फिरताय आपण चांगले आहोत, चांगल्या माणसांचा चेहरा लावावा, असं म्हणत राज ठाकरेंनी एका महिलेला फटकारलं.

11:50 (IST) 4 Oct 2026
Garjana Morcha Mumbai Live Updates : देशातील हिटरलशाहीविरोधात मोर्चा - संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत म्हणतात, "हा निषेध देशात सुरू असलेल्या हिटलरशाहीविरोधात, निवडणुका हायजॅक करण्याविरोधात, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय आपल्या खिशात ठेवण्याविरोधात, हुकूमशाही चालवण्याविरोधात, मते चोरण्याविरोधात, निवडणुका चोरण्याविरोधात आणि खासदार-आमदार पळवण्याविरोधात आहे. हा या सगळ्याविरुद्धचा एक बंड आहे, अगदी १८५७ च्या उठावासारखा... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निषेध मोर्चाची घोषणा केली असून, संपूर्ण महाविकास आघाडी याला पाठिंबा देत आहे. हा मोर्चा आता सुरू होणार आहे आणि प्रत्येक जण मंचावर येऊन देशाला संबोधित करेल."

https://twitter.com/ANI/status/2106626325184418196

11:46 (IST) 4 Oct 2026
Garjana Morcha Mumbai Live Updates :

उद्धव ठाकरेंच्या विनंती मान देऊन काँग्रेसही गर्जना मोर्चात सामील. बाळासाहेब थोरात यांची मोर्चाला उपस्थिती. उद्धव ठाकरेंच्या गाडीतून रवाना

11:34 (IST) 4 Oct 2026

मोर्चास्थळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली, उद्धव-राज ठाकरे सभास्थळासाठी रवाना

मोर्चासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मुंबईत दाखल, राज-उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

https://twitter.com/ANI/status/2106617364951482728?s=20

11:12 (IST) 4 Oct 2026
Garjana Morcha Mumbai Live Updates : एल्गार करावाच लागेल - भास्कर जाधव

या देशात प्रत्येक क्षेत्रात फक्त चोऱ्याच होत आहेत. विद्यार्थ्यांची पेपरची चोरी, व्यापाऱ्यांची चोरी, डिझेल, पेट्रोल चोरी, करचोरी आता मतांची चोरी होते आहे तरीही चोरांचं समाधान होत नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे एल्गार करावाच लागेल असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

11:03 (IST) 4 Oct 2026

उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना

उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना, मोर्चात सहभागी होणार. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ते भाषण करणार असून त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

11:01 (IST) 4 Oct 2026

गब्बरच्या वेषात कार्यकर्ता दाखल

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, नाहीतर गोळीने मारून टाकू, असं म्हणत गब्बरच्या वेषात कार्यकर्ता दाखल

10:58 (IST) 4 Oct 2026

ज्ञानेश कुमारांना वरून मार्गदर्शन - अनिल देशमुख

ज्ञानेश कुमारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. त्यांना वरून मार्गदर्शन असल्याशिवाय त्यांची एवढी हिंमत असणार नाही - अनिल देशमुख</p>

10:57 (IST) 4 Oct 2026

ठाकरेंच्या मोर्चामुळे दिल्लीची खुर्ची हादरली आहे - भास्कर जाधव

आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढतोय. भाजपाला कळून चुकलंय की निवडणूक आयोगाच्या विरोधात काही कारवाई झाली तर आपण त्यात सापडणारच आहोत. दिल्लीचं सिंहासन डळमळीत झालं आहे. दिल्लीची खुर्ची हादरली आहे, त्यामुळे राजीनामा होण्याची शक्यता आहे - भास्कर जाधव</p>

10:44 (IST) 4 Oct 2026

जनतेचा कौल स्वीकारण्याची हिंमत नसल्याने हे मोर्चे निघत आहेत - चित्रा वाघ

कालपर्यंत एकमेकांवर चिखलफेक करणारे दोन भाऊ राजकारणासाठी एकत्र आले आहेत. जनतेचा कौल स्वीकारण्याची हिंमत नसल्याने हे मोर्चे निघत आहेत - चित्रा वाघ</p>

10:41 (IST) 4 Oct 2026

लोकक्षोभ आज दिसून येईल - विनायक राऊत

संपूर्ण मुंबईकर या मोर्चात येऊ लागला आहे. ज्ञानश कुमारांनी ज्याप्रकारे संविधानाची होळी करायची ठरवली आहे, चोळामोळा करायची ठरवली त्याविरोधात लोकक्षोभ आहे, तो या मोर्चातून दिसून येईल - विनायक राऊत

10:38 (IST) 4 Oct 2026

गर्जना मोर्चादरम्यान ईव्हीएमचं श्राद्ध

  • गर्जना मोर्चादरम्यान ईव्हीएमचं श्राद्ध
  • विचारांचं श्राद्ध घालतोय, असं सांगत कार्यकर्त्यांचा संताप
  • निवडणूक काळात अनेक ठिकाणी घोळ झालाय
  • सीजेपीसह अनेक पक्षांचा मोर्चाला पाठिंबा
  • 10:25 (IST) 4 Oct 2026

    गर्जना मोर्चासाठी उद्धव ठाकरेंनी कोणा-कोणाशी साधला संवाद?

    संविधान वाचवण्यासाठी, निवडणूक आयोगातील भ्रष्टाचार, घोटाळे, निवडणुका हायजॅक करणे, कोट्यवधि मतदारांना हक्काच्या मतापासून वंचित ठेवणे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या ज्ञानेश कुमार जे भाजपाचे एजंट आहे, त्यांच्याविरोधात हा विराट मोर्चा आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पुढाकारातून हा मोर्चा निघतोय, त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील, डाव्या पक्षाचे शैलेंद्र कांबळे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे. या मोर्चासाठी पूर्ण तयारी आहे - संजय राऊत</p>

    10:22 (IST) 4 Oct 2026

    ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात जयंत पाटीलही सहभागी होणार

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील सहभागी होणार

    10:14 (IST) 4 Oct 2026

    अमित ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी रवाना

    09:33 (IST) 4 Oct 2026

    मेट्रो सिनेमाजवळ बॅरिकेटिंग तर, BMC मुख्यालयाजवळ स्टेज बांधणी; ज्ञानेश कुमारांविरोधातील ठाकरेंच्या मोर्चाला लवकरच सुरुवात

    ठाकरेंच्या मोर्चाला लवकरच सुरुवात होणार असून त्याकरता कार्यकर्ते मेट्रो सिनेमाजवळ पोहोचायला सुरुवात झाली आहे.

    Uddhav Thackeray morcha against Gyanesh Kumar live updates | Metro Cinema BMC headquarters barricading security setup | ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचा मोर्चा मेट्रो सिनेमा बॅरिकेटिंग | बीएमसी मुख्यालयाजवळ ठाकरे गटाच्या मोर्चाची स्टेज बांधणी

    ज्ञानेश कुमारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मोर्चा: मेट्रो सिनेमा परिसर

    Thackeray Morcha Live Updates : ठाकरे बंधूंच्या मोर्चातील लाईव्ह अपडेट्स वाचा