Uddhav Thackeray Ram Mandir Andolan : अयोध्येतील राम मंदिरात रामभक्तांनी दिलेल्या देणगीचा अपहार झाला असून याप्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. यावरून देशभरातील रामभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील रामभक्तांनी रविवारी, ५ जुलै रोजी दादर येथील कबुतरखाना येथे असलेल्या मारुती मंदिराजवळ आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली.

राम मंदिरासाठी शिवसैनिकांनीही आंदोलन केलं होतं

“संपूर्ण देशात गोंधळ, सर्वासामान्यांबद्दल अनास्था ओढावली आहे. कोणाला कोणाचं उत्तरदायित्वच राहिलेलं नाही. याच्या मुळावर आघात करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण देश हा आज भाजपाच्या अंमलाखाली आहे. राम मंदिर हे भाजपाच्या सत्तेचं मूळ आहे ज्यात आम्हीही सहभागी होतो. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं, त्यात अनेक शिवसैनिक होते. देशातील तमाम हिंदू सहभागी होता. तो काळही आठवत असेल. आपल्या माध्यमातून हे सारं दृष्य जनतेच्या मनात खोलवर रुजलेले आहे. कारसेवकांवरील अत्याचार, गोध्रामधील दंगल, अहमदाबादमधील दंगल, मुंबईतील बॉम्बस्फोटमध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं”, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी शेअर केली.

चोरीचा पैसा पक्ष फोडण्याकरता?

पुढे भाजपावर टीका करताना ते म्हणाले, “राम मंदिरासाठी हे आंदोलन सुरू होण्याआधी भाजपाचे संपूर्ण देशात दोनच खासदार होते. गांधीवादी समाजवाद हा त्यांनी अंगिकारलेला कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सोडून ते हिंदूत्त्वाकडे वळले आणि राम मंदिराच्या कार्याला हात घातला आणि आज याचं भांडवल करून ते देशात अमर्याद सत्ता उपभोगत आहेत. अशा या भाजपाच्या काळात राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या गोष्टीमुळे चर्चिला जातोय, हे दुर्दैवं आहे. आज राजकीय दरोडेखोरी सुरू आहे, आमदार- खासदार चोरले जात आहेत, त्याला ऑपरेशन नाव दिलं जातंय मग आता ऑपेरशन राम मंदिर भाजपा करतंय का हा मुद्दा आहे. या बातम्या दाखवल्या जात असतील-नसतील, पण चोरी तर होतेय. राम मंदिरावर दरोडा टाकला गेलाय, त्याबाबत पुरावेही दिले आहेत. त्या चोरीचा पैसा पक्ष फोडण्याकरता वापरला जात आहे, असं म्हटलं जातंय, हे फार गंभीर आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अब हिंदू माफ नहीं करेगा

“एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा. तसं आज मी म्हणतोय की आता हिंदू माफ नहीं करेगा, असं म्हणायची वेळ आली आहे. जे जे मंदिर लुटत आहेत, त्यांना हिंदू जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली.

रविवारी रामरक्षा आंदोलन

“त्याची सुरुवात येत्या रविवारपासून करत आहोत. येत्या रविवारी ५ जुलैला सायंकाळी ४ च्या सुमारास रामरक्षा आंदोलन करत आहोत. दादरच्या कबुरतखाना येथील मारुतीच्या मंदिरासमोर तमाम हिंदूंना येथे जमायचं आहे. पक्ष वगैरे न पाहता जे जे हिंदू आहेत, रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी सहन होत नाहीय, ज्यांना जाब विचारायचा आहे, ते सर्व रविवारी येतील. मी स्वतः तिथे जाणार आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी असतील. शिवसैनिक, तमाम रामभक्त तेथे येतील. ज्यांनी ज्यांनी हिंदूत्त्व सोडलेलं नाही, बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, हिंदू असतील तर त्यांनी इथं यावं. तिथे रामरक्षा आंदोलन करत आहोत”, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

राज्यभर आंदोलन होणार

“हिंदूंना जागं करण्याकरता महाआरती करत होतो. आता हिंदू जागे झाले आहेत, आता हिंदूनी जाब विचारावा म्हणून हा कार्यक्रम जाहीर करत आहोत. परवाचा कार्यक्रम ही सुरुवात आहे, त्यानंतर राज्यपातळीवर जिथे जिथे राम मंदिर, हनुमान मंदिर असेल तिथे सर्व रामभक्त एकत्र होऊन भाजपाला याचं उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.