Sanjay Raut on RSS and Ram Mandir Temple Scam : राम मंदिर देणगी घोटाळाप्रकरणी चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेकविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई रामरक्षा आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंनी आंदोलन पुकारल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर देणगी घोटाळाप्रकरणी निवेदन दिलं, असं संजय राऊत म्हणाले. आज ते माध्यमांशी बोलत होते.

राम मंदिरावर दरोडा पडलाय

“राम मंदिर देणगी घोटाळाप्रकरणी कारवाई होईल. पण कारवाई होताना दिसत नाही. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा पाचपेक्षा जास्त लोक सहभागी असतात, तेव्हा ती चोरी नसते, तो दरोडा असतो. इथं पाचपेक्षा जास्त लोक आहे. त्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला आहे. राम मंदिराच्या ट्रस्टवरच कारवाई व्हायला हवी, कारण ते कर्तव्यास मुकले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

ट्रस्टमध्ये सर्व चोर एकत्र आणले

“शिवसेनेने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी यांनी राम मंदिराच्या लुटीविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तातडीने भूमिका मांडली. आधी का नाही मांडली? या आंदोलनामुळे जर ठिणगी पडली तर… मुळात ही ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे. एकतर्फी ट्रस्ट नको. ही भाजपाची ट्रस्ट झाली आहे. त्यामुळे इतर कोणी नाहीय. सर्व चोर एकत्र आणले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या बाजूने बोलू नये. त्यांनी रामभक्ताच्या बाजूने बोलावं. दुर्दैवाने ते भाजपाची कातडी वाचवण्यासाठी स्वतःची ढाल देत आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“शिवसेनेचं उद्या आंदोलन आहे, उद्या त्याची सुरुवात आहे. महाराष्ट्रात ते पसरणार. देशभर हे आंदोलन होऊ शकतं. फक्त ५५० कोटींच्या देणगीवर डल्ला नाहीय. प्रभू श्रीरामांची आभूषणे चोरीला गेली आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी सर्व आभूषणांची नावेही घेतली.