Uddhav Thackeray On Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यावरून टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान दिले होतं. दरम्यान, आता मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री या त्यांच्या निवास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यााबाबत तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. हेही वाचा - “आधी तिकीट आणून दाखवा, मग कोण कोणाला गाडतं…”; शिवसेना नेत्याचं ठाकरे गटाच्या नेत्याला आव्हान नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? “काही दिवसांपूर्वी मी संभाजीनगरमध्ये बोलताना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली होती. मधल्या काळात सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवून एक नाटक करण्याचा प्रयत्नही केला होता. मुळात आम्ही अनेकदा याबाबत भूमिका मांडली आहे. ज्यावेळी विधानसभेत मराठा आरक्षणासंतर्भातलं विधेयक मांडण्यात आलं, तेव्हाही आम्ही त्याला पाठिंबा दिला होता. आमचं म्हणणं इतकंच आहे, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा ( उद्धव ठाकरे गट ) त्याला पाठिंबा असेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “ज्यावेळी काही मराठा आंदोलक मला भेटायला आले, तेव्हा मी त्यांना हेच सांगितले, की दोन समाजाला एकमेकांविरोधात लढवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एकाच आईची मुलं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी एकत्र या, त्यासाठी शिवसेनेचं काही सहकार्य लागत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत”, असंही त्यांनी सांगितलं. “आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार हे लोकसभेला” पुढे बोलताना, “आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही. यापूर्वी बिहार सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, न्यायालयाने ते रद्द केलं. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार हे लोकसभेला आहेत. त्यामुळे सर्व समाजाच्या नेत्यांना पंतप्रधान मोदींकडे जावं लागेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. हेही वाचा - Kiran Mane : “तुम्ही बाहेरून जसे वाटत होता…”, उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “तुम्ही मला कधी मदत…” “राज्यात आरक्षणासाठी भांडू नका, मोदींकडे जा” “आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यामुळे सर्वच समाजाला पंतप्रधान मोदींकडे हा प्रश्न मांडावा लागेल. मी सर्व समाजाच्या लोकांना विनंती करतो, की त्यांनी राज्यात आरक्षणासाठी भांडण केल्यापेक्षा दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना यात लक्ष घालण्याची विनंती करावी, कारण त्यांच्याकडे मोठी दैवीशक्ती आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.