‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमात झालेल्या भाषणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिन्ही नेत्यांनी आपल्या खास शैलीत जोरदार राजकीय टोलेबाजी केली. हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे राजकीय चर्चांनाही उधाण आल्याचं पाहायला मिळालं. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.

‘२०१९ पर्यंत उद्धव ठाकरे यांनी जेव्हा जेव्हा मला फोन केला, तेव्हा तेव्हा मी गेलो. पण २०१९ नंतर बोलावलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो’, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्याला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला. ‘काही जणांचे फोन २०१९ नंतर थांबले ते थांबलेच’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राजकीय टोलेबाजी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“बाळासाहेब ठाकरे जसं अमरिश यांना फोन करायचे, तसं मी देखील त्यांना फोन करत होतो. पण मध्यंतरी काही जणांचे आणि माझे फोन थांबले. पण अमरिशसोबत थांबलेला फोन पुन्हा सुरू झाला. मात्र, काही जणांचे फोन २०१९ पासून थांबले ते थांबलेच. आता ते फोन काही होणार नाहीत. मात्र यांच्या फोनने बरंच काही होईल.”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला. ते संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.

‘२०१९ नंतर बोलावलंच नाही’, फडणवीसांनी काय म्हटलं होतं?

‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या अत्यंत सुंदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असलेले उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आशिष शेलार आणि बंधू भगिनींनो सर्वच लोक डाव्या बाजूला गेले म्हणून जाणीवपूर्वक उजवीकडे आलो. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की व्यंगचित्रकारांच्या कार्याचा गौरव करणारी आणि त्यांच्या इतिहासाचं संकलन करणारा ग्रंथ प्रशांत कुलकर्णींनी उत्तमपणे संपादित केला. या प्रकाशनासाठी मला राज ठाकरेंचा फोन आला. मग प्रशांतजीही मला भेटले. मलादेखील अतिशय आनंद वाटला. मगाशी आशिषजी असं म्हणाले की राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्रजी येतात. पण आशिषजी, २०१९ पर्यंत उद्धवजींनी जेव्हा-जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा मी गेलो. २०१९ नंतर बोलवलंच नाही, नाहीतर गेलो असतो. मी वाटच पाहात राहिलो”, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.