Sanjay Raut on BMC Mayor Election: महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २९ महानगरपालिकांपैकी २५ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तासमीकरणं नव्याने मांडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे चंद्रपूरमध्ये भाजपा व काँग्रेस यांच्यातील आकडेवारीच्या पेचामुळे ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत कुणाशी युती करणार? याची उत्सुकता असताना दुसरीकडे मुंबईचा महापौर भाजपाचा की महायुतीचा? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
भाजपा आपल्याच नगरसेवकांचे फोन टॅप करतेय – संजय राऊत
संजय राऊत यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपाबाबत मोठा दावा केला आहे. “भाजपाच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवले आहेत. नगरसेवकांवर लक्ष ठेवलं जात आहे. आत्ता ताज लँड्समध्ये कैदखान्यात असणाऱ्या नगरसेवकांचेही फोन टॅप होत आहेत. रश्मी शुक्ला नसल्या, तरी प्रक्रिया तीच आहे. भाजपा आपल्या स्वत:च्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहेत”, असं ते म्हणाले. मुंबईच्या महापौरपदाबाबतच्या चर्चेसंदर्भात त्यांना विचारलं असता त्यावरून राऊतांनी शिंदेंवर टीका केली.
“मुंबईचा महापौर कोण आहे हे दिल्लीतून ठरवलं जाईल. आत्तापर्यंत हे इतिहासात कधी घडलं नव्हतं. महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या लोकांना दिल्लीच्या पायाशी जाऊन बसावं लागतंय हा महाराष्ट्राचा अपमान आहे”, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असून तिथेही महापौरपदाबाबत चर्चा चालू असल्याचं ते म्हणाले. “दावोसमध्ये गुंतवणुकीवर कमी चर्चा चालू आहे. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात मुंबईच्या महापौराबाबतच चर्चा चालू असते”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं.
चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याबाबत यावेळी संजय राऊतांनी भूमिका मांडली. चंद्रपूरमध्ये काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यापैकी कुणालाही बहुमत मिळालं नसताना ठाकरे गटाच्या मदतीशिवाय महापौर बसणं अशक्य ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट स्थानिक पातळीवर भाजपाशी युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात स्थानिक बाबींचा विचार करून उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
भाजपाकडून शिंदे गटाची दिल्लीत तक्रार?
दरम्यान, मुंबईतील निकालांबाबत भाजपा समाधानी नसून स्थानिक नेत्यांनी दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदेंनी जास्त जागा लढवल्यामुळेच मुंबईत भाजपाचा स्ट्राईक रेट कमी झाला, अशी ही तक्रार असून त्याबाबत संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
“हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका संपल्या आहेत. लोकसभा ते महानगरपालिका हे वर्तुळ पूर्ण झालं आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही यावर दिल्लीत लवकरच चिंतन सुरू होणार आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
