राहाता: पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल तोच भाजपाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री व्हायचा. सध्या संघाची पकड भाजपवर राहिली की नाही हे कळत नाही. हे फोडाफोडीचे व गद्दारीचे राजकारण संघाला मान्य आहे का ? हे संघाने एकदा जाहीर करावे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करीत भाजपने पक्षाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असल्याची खोचक टीका केली. मी देवेंद्र फडणवीसांचा शत्रू नसून हितचिंतक असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांनी विदर्भापासुन सुरू केलेल्या दौऱ्याची शेवटची सभा आज, सोमवारी शिर्डी शहराजवळ झाली. त्यावेळी ठाकरे बोलत होते. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, आदित्य ठाकरे, संपर्कप्रमुख आमदार संजय शिंदे आदी उपस्थित होते.
फडणवीस यांचे पंख कापायचे, तीच गोष्ट नितीन गडकरी यांच्या बाबतीत केली होती. गडकरी व फडणवीस यांना संघाचा पाठिंबा असल्याने गडकरी भाजप अध्यक्ष तर फडणवीस मुख्यमंत्री झाले होते ना, मी संघाला विचारतो, तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटा चालू आहे का ? ती संघाला मान्य आहे का ? याचे उत्तर संघाने द्यावे. आम्ही भाजपचे गुलाम झालो आहे. हे संघाने जाहीर करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. भाजपला संघाची गरज नाही, असे जे. पी. नड्डा यांनी यापूर्वी सांगितल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली.
ठाकरे यांना संपण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण मी व्यक्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिवसेना आहे आणि ते विचार कधी संपणार नाही. कारण बाळासाहेबांचा हा विचार आहे. अशा किती ‘शहासेना’ आल्या तरी हा ठाकरेंचा विचार ते कधीच उखडून फेकू शकणार नाहीत असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपपेक्षा राज्यात शहासेनेची ताकद वाढली. यामध्ये मिंधे ‘गद्दार सुपारी किंग’ आहे. फडणवीस यांच्या खुर्चीचा पत्ता कापला जाणार आहे. मी कुणाचा वाईट चिंतणारा माणूस नाही. मी सर्वांचं भले इच्छिणारा माणूस आहे. फडणवीस यांची खुर्ची वाचावी यासाठीही मी प्रार्थना केली. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येणार नाहीत. यासाठी शाहसेना फडणवीस यांना संपवण्याची काम करीत आहे. शहा सेनेला पैशाचा भार सोसवत नसल्याने ते खासदार फोडत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
सन २०१४ आणि २०२४ च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत, चूक माझीच आहे, अशी कबुली देत ठाकरे म्हणाले, मला या खासदारांच्या भानगडी आधी कुणी सांगितल्या नव्हत्या. खासदार तिकडे गेला, त्याला पक्षात आणणाराही तिकडे गेला; पण त्यांना स्वतःच्या घामाने आणि पैशाने निवडून देणारा साधा शिवसैनिक, शेतकरी आजही प्रामाणिकपणे इथेच उभा आहे. कामांसाठी विकास निधी मिळत नाही असे सांगत या सहा गद्दारांनी पक्ष सोडला. विकास निधी कामांसाठी मिळत नसेल तर ही गंभीर बाब आहे. कारण विकासनिधी हा करदात्यांचा पैसा आहे.
खासदार फुटताहेत, पेपर फुटताहेत मात्र तुमच्या संतापाचा बांध का फुटत नाही. हे विचारण्यासाठी मी येथे आलोय असे ठाकरे म्हणाले. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाच विभाजन करण्याचा डाव आम्ही हाणून पाडला आहे.आता जर हे विधेयक मंजूर झाले तर देशाचं नेतृत्व उत्तर भारताकडे जाईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. देशावर व राज्य अरिष्ठ लोकांचे संकट आले आहे. ते काढून टाक अशी प्रार्थना आपण साईचरणी केल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांची भलामण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ठाकरे यांनी, गद्दार सोडून महाराष्ट्राचा कोणताही मराठी माणूस जर पंतप्रधान होणार असेल, तर शिवसेना त्याला नक्कीच पाठिंबा देईल, अशी भलामण देवेंद्र फडणवीस यांची केली. एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे हा शह मानला जात आहे. माझे सरकार गद्दारी करून पाडले. त्यानंतरच्या निवडणुकीत आम्हाला नवीन निशाणी केवळ पंधरा दिवस अगोदर मिळली होती. बाळासाहेबांचा चेहरा त्यांनी चोरल्याने थोडा संभ्रम झाला. बिन बापाचा पक्ष आहे तो व त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो, एक दिल्लीत तर एक इकडे. तिकडे मी माझ्या वडिलांच्या आधारावर नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि नऊ खासदार शिवसेनेने निवडून आणले, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
