गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी हे युक्तीवाद करत आहेत. त्यामुळे लवकरच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय लागण्याची शक्यता आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज (४ ऑगस्ट) उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज बीड जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे २५० कार्यकर्ते (बीएलए) मुंबईत आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं भाष्य करत ‘नावाचा दुरुपयोग करणारे बरेचजण आहेत. पण आपण आता त्यांचा समाचार घेत असून लवकर त्याचा निकाल लागेल’, असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“सध्या नावाचा दुरुपयोग करणारे बरेचजण आहेत. त्यांचा समाचार आपण घेत चाललेलो आहोतच. आता त्याचा निकाल देखील लवकरच लागेल अशी आपल्याला खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलताना दिली आहे.
‘बीड जिल्हा भगवा करण्याची आपल्याला संधी’ : उद्धव ठाकरे
“तुम्ही सर्व बीड विधानसभा मतदार संघामधून आलेला आहात. तुम्ही सर्व एका मतदारसंघामधून बीएलए या ठिकाणी आलेला आहात. त्यामुळे तुमच्या सर्वांचं कौतुक आहे. बीड म्हटल्यानंतर आधी आपली आणि भाजपाची युती होती, खरं तर तेव्हाची ही युती फार वेगळी होती. आता सारखं तेव्हा नव्हतं. त्यामुळे तेव्हा त्यांच्या प्रेमाखातर बीड जिल्ह्यातील बऱ्याच जागा आपण भाजपाला सोडल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला की त्यामुळे बीडमधील आपलं अस्तित्व हळहळू कमी होत गेलं. मात्र, आता पुन्हा एकदा बीड जिल्हा भगवा करण्याची संधी आपल्याला आली आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“आज बीएलए म्हणून तुमच्यावर महत्वाची जबाबदारी आहे. सध्या भाजपा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळतं आहे आणि निवडणुका जिंकत आहे. या बोगस मतदार नोंदणीबाबत पहिल्यांदा आवाज कोणी उठवला होता तर परकला प्रभाकर यांनी उठवला होता. त्यांनी सांगितलं होतं की लोकसभा ते विधानसभा या दरम्यान ४५ लाख मतदार जास्त नोंदवले गेले. मग ते कुठून आले होते? आणि आता एसआयआरमध्ये २ कोटी मतदार वगळले गेले आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
