उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी पक्षादेश (व्हीप) धुडकावत महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांवर ठाकरे गट काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी मोठी अपडेट दिली आहे. या खासदारांवर तत्काळ कोणतीही कारवाई करण्यात येणार नसून त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद सावंत यांनी पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली.
संध्याकाळपर्यंत ‘कारणे दाखवा’ नोटीस; ७ दिवसांची मुदत
अरविंद सावंत म्हणाले, “आज सकाळी ११ वाजता बोलावण्यात आलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला मी स्वतः, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत उपस्थित होतो. मात्र, पक्षाचा व्हीप बजावूनही ६ खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. बैठकीला उपस्थित न राहणे हा थेट पक्षद्रोह आहे. त्यामुळे या सर्व खासदारांना आज संध्याकाळपर्यंत ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात येईल.”
या नोटिसीला उत्तर देण्यासाठी संबंधित खासदारांना ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर पक्षद्रोह आणि अपात्रतेसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सावंत यांनी दिला.
‘या’ सहा खासदारांनी मारली दांडी!
ठाकरे गटाच्या ज्या ६ खासदारांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- संजय देशमुख
- संजय जाधव
- नागेश पाटील आष्टीकर
- भाऊसाहेब वाकचौरे
- संजय दिना पाटील
- ओमराजे निंबाळकर
लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेणार; शरद यादव यांच्या कारवाईचा दाखला देणार
“या खासदारांनी पक्षाचा व्हीप पाळला नसल्याची अधिकृत माहिती आम्ही लोकसभा अध्यक्षांना देणार आहोत,” असे सांगत सावंत यांनी भूतकाळातील ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यावरील कारवाईचा दाखला दिला.
ते म्हणाले, “शरद यादव यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर भाषण केले होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाने लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. जर या सहा जणांनी वेगळा गट स्थापन केला असेल, तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र जाहीर करावे. चोरी करणारे आपली चोरी का लपवत आहेत?”
“मतदारांशी प्रतारणा; हिंमत असेल तर राजीनामा द्या”
बंडखोर खासदारांवर टीका करताना सावंत म्हणाले, “तुमची ओळख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे आहे. पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आणि जनतेने भाजप तसेच मिंधे गटाच्या विरोधात ‘मशाल’ चिन्हावर मतदान करून तुम्हाला निवडून दिले. तुमच्यात जर हिंमत आणि धाडस असेल, तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा.”
“‘व्हीप लागू होत नाही’ असे म्हणणे हा अडाणीपणाचा कळस आहे आणि महाराष्ट्राची जनता हा राजकीय बाजार कधीही सहन करणार नाही,” असा संतप्त इशाराही त्यांनी दिला. या ७ दिवसांच्या मुदतीनंतर ठाकरे गट बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणती कायदेशीर लढाई लढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
