शिवसेना ठाकरे गटाने अयोध्येतील राम मंदिरातील झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा तापवून भाजपला शह देण्याबरोबरच हिंदुत्वाची धार पुन्हा आक्रमक केली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा ठाकरेंनी सोडला, या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या सतत होणाऱ्या आरोपांमुळे निवडणूक निकालांवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा स्पर्श केला आहे. हिंदुत्वाची कास पुन्हा धरल्यास ठाकरे गटाला त्याचा कितपत फायदा होतो हे कालांतराने स्पष्ट होईल; पण पुन्हा एकदा ठाकरे गटाची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे.
शिवसेनेने मराठीचा मुद्दा हाती घेत मुंबई, ठाण्यात बस्तान बसविले. मुंबईतील मराठी टक्का घटून इतर प्रांतीयांची लोकसंख्या वाढल्याने शिवसेनेनेही आपल्या भूमिकेत बदल करावा लागला. शिवसेनेने तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. १९८७च्या विलेपार्ले विधानसभेच्या पोटनिवडणुकीने शिवसेनेसाठी कलाटणी देणारी ठरली. शिवसेनेने तेव्हा जाहीरपणे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. माजी महापौर रमेश प्रभू विरुद्ध माजी मंत्री प्रभाकर कुंटे यांच्यात लढत झाली होती. तेव्हा शिवसेनेने ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिली. विलेपार्ले मतदारसंघात मराठीबरोबरच गुजराती, उत्तर भारतीयांची मते निर्णायक होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. हिंदू संकटात असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले. हा शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा प्रसंग होता. धार्मिक प्रचार आणि भ्रष्ट पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत प्रभू यांची निवड न्यायालयाने रद्दबातल ठरवली. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाने ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. हे सारे शिवसेनेच्या वाढीस पोषकच ठरले. शिवसेना तेव्हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून पुढे आला. बाबरी मशीद पाडणे, त्यानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीनंतर शिवसेनेने हिंदुत्वाचे संरक्षक अशी स्वत:ची प्रतिमा तयार केली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेला उपयुक्त ठरला. राज्याची सत्ता शिवसेना-भाजप युतीला मिळाली.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची जहाल भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी रामदास आठवले यांना बरोबर घेत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला. २०१४ नंतर भाजपची जशी घोडदौड सुरू झाली, तशी शिवसेनेची पीछेहाट सुरू झाली. भाजप मोठ्या भावाची भूमिका वठवू लागला.
२०१९ नंतर शिवसेनेची प्रतिमा बदलली
राज्यातील २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणातील सारीच समीकरणे बदलली. तेव्हा शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर जात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले; पण शिवसेनेला त्याचा फायदा झाला नाही. उलट शिवसेनेची घसरण होत गेली. काँग्रेसबरोबर गेल्याने उद्धव ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाच्या भूमिकेला काहीशी मुरड घातली. कारण मुस्लिमविरोध काँग्रेस व राष्ट्रवादीला मान्य नव्हता. ठाकरेही बदलले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणाची सुरुवात ‘येथे जमलेल्या माझ्या मराठी बांधवानो, मातांनो,’ अशी आधी करायचे. शिवसेनेने हिंदुत्व स्वीकारल्यावर शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची सुरुवात ‘येथे जमलेल्या हिंदू…’ अशी झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांची री ओढली. महाविकास आघाडीत सामील झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला मुठमाती दिल्याचा आरोप होऊ लागला. ‘हिंदू’ हा शब्द त्यांनी भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यातून वगळला. त्यावरून भाजपने ठाकरे यांच्यावर शरसंधान केले. ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप होऊ लागला. यावरून बरीच टीका झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ‘हिंदू’ शब्दाचा वापर सुरू केला.
‘रामरक्षा’ आंदोलन कितपत फायदेशीर?
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरीविरोधात ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक उद्धव ठाकरे यांनी दिली. दादर येथील हनुमान मंदिरातील महाआरती, रामरक्षा पठण, हनुमानचालिसा, हनुमान स्तोत्र पठणाच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन गावागावात पोहोचवून मंदिरा-मंदिरांत रामरक्षा पठण करून भाजपला जाब विचारण्याचे आवाहन केले. भाजपवर कुरघोडी करण्यासाठी ठाकरे यांचे हे आंदोलन आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या आंदोलनाचा ठाकरे गटाला कितपत फायदा होतो हे आता बघायचे. ठाकरे गटाच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दखल घ्यावी लागली. भाजपचे नेते ठाकरे यांच्यावर टीकाटिप्पणी करू लागले.
राम मंदिरासाठी केलेले दान गेले कुठे? राममंदिर लुटले जात असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही. शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली? रामरक्षा आंदोलन ही भरपावसात पेटलेली ठिणगी आहे. जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणे निकाल लागला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अयोध्या झांकी असेल, तर काशी, मथुरा किती लुटतील, असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दादरच्या सभेत केला. बारा वर्षे झालीत, ज्यासाठी मेहनत केली होती. ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलखानी विडा उचलला. का उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशात शिवसेना केवळ एकमेव पक्ष आहे, जो निधड्या छातीने सरकारला प्रश्न विचारतोय. राम मंदिर उभारणीसाठी अडवाणी यांनी पुकारलेल्या आंदोलनावेळी ‘अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है,’ असे ब्रीदवाक्य होते. मात्र आता भीती वाटायला लागली, ही अयोध्येची झांकी असेल, तर काशी, मथुरा किती लुटतील, असा सवाल त्यांनी केला.
हिंदूंना लुटणारं सरकार तिथे बसलेय, हे आपले दुर्भाग्य आहे. पहिली सुरुवात शंकराचार्यांनी केली. केदारनाथातील सोने लुटले गेले. मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांवर उज्जैनमधील जमीन लुटल्याचे आरोप झाले. बद्रीनाथमध्येही चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येत एक आयएएस अधिकारी बोलतात, आईचे सोन्याचे दागिने वितळवले आणि एक किलो सोन्याचा मुलामा असलेले रामचरितमानस गायब झाले. नऊ-नऊ तास बसवले जाते, पण उत्तर दिले जात नाही. शिवसेनेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे दिलेले, चांदीच्या विटा दिलेल्या, कुठे गेले सगळे, असा सवाल त्यांनी केला.
ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘गर्व से कहो हम हिंदू है’चा नारा दिला आहे. भाजपने आधीच हिंदुत्वावर उघडपणे भूमिका घेतली आहे. अशा वेळी ठाकरे यांच्या राम मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आंदोलनाला कितपत समर्थन मिळते व त्याचा राजकीय लाभ किती होतो, हे महत्त्वाचे असेल.
