मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतरवर काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. रणरणत्या उन्हात भविष्याची चिंता घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या तरुण पिढीला कॉक्रोच म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. ही तरुणपिढी कॉक्रोच बनून आक्रोश करीत असून त्यांना कमी लेखू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
नीट पेपरफुटीविरोधात अभीजित दीपके या तरुणाने समाजमाध्यमांद्वारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे आंदोलन छेडले. त्याला देशभरातील तरुण वर्गाकडून जोरदार पाठिंबा मिळत असून दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनातही हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शविला असून यासंदर्भात त्यांनी निवेदन जारी करीत सरकारला इशारा दिला.
दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. नीट पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर विविध विद्यार्थी संघटनांकडून नीट पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे.
अभिजीत दिपके हा या चळवळीचा प्रणेता असून त्यानंच पहिल्यांदा या नावानं ही चळवळ सुरु केली, ज्याच्या इन्स्टाग्राम पेजला पाठिंबा दर्शवण्यासाठी केवळ दोनच दिवसांत एक कोटी फॉलोवर्स झाले. हा प्रत्यक्षात एक मोठा विक्रम असून जगातील सर्वात मोठा पक्ष अशी जाहिरात करणाऱ्या भाजपलाही हे जमलेले नाही, अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. ही चळवळ केवळ सोशल मीडियातच गप्पा मारुन विझून जाईल असं मत अनेकांनी व्यक्त केले होते, पण या चळवळीनं प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत आज दिल्लीत जोरदार आंदोलन करुन दाखवले.
