Uddhav Thackeray Slams Bachchu Kadu: शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू यांच्यावर शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी जोरदार टीका केली आहे. “आपल्यातून जो गेला तो देखील जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक होती”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कडू यांच्यावर केली. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती राजकीय पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करुन धुनष्यबाण हाती घेतला. या पक्षप्रवेशावरुन उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे.
नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून मंत्री केला ही माझी चूक झाली. लोभापायी जे गेले त्यांना जाऊ द्या, लढणारे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, याचा मला आनंद आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वीही टीका
यापूर्वी सामनाच्या अग्रलेखातून कडू यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. “अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंधे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली,” असे टीकास्त्र अग्रलेखातून कडू यांच्यावर सोडण्यात आले.
सामनाच्या अग्रलेखातूनही केली होती टीका
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कडू यांना लक्ष्य करण्यात आले होते. “कोविड काळानंतर सत्ताबदलाची चाहूल लागताच अपंग, शेतमजुरांच्या कल्याणासाठी त्यांनी मिंध्यांची भलामण सुरू केली. ही भलामण करूनही मंत्रीपद मिळाले नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली. उपोषणे, आंदोलने सुरू केली. कडू महाराज २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हरले. त्यांची आमदारकीची वस्त्रे जनतेने उतरवली तेव्हापासून त्यांची तडफड सुरू होती. आता या तडफडणाऱ्या आत्म्याने शरीरावर नवीन वस्त्रे परिधान करून मिंधे पक्षात प्रवेश केला व पुन्हा ‘आमदार’ म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला”, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली होती.
अजेंडा बदलणार नाही – बच्चू कडू
दरम्यान, “झेंडा हातात घेतला असला तरी अजेंडा बदलणार नाही”, असे कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूमिका स्पष्ट केली होती. न्यूज-१८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कडू म्हणाले होते की, हिंदू असल्याचा गर्व नक्की आहे पण, वाद होता कामा नये. माझ्या मुद्यांवर कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, लोकभावना तशी असती तर मला असा निर्णय घेण्याची गरजच पडली नसती, असेही कडू म्हणाले होते.
