मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांची निवडणूक पुढच्या आठवड्यात १५ जानेवारी रोजी रंगणार आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती लढते आहे. या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसंच शिंदे सेनेचा वापर करतील आणि फेकून देतील असंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“निवडणूक योग्य पद्धतीने व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. पूर्वी एक परिस्थिती होती की चोर चोर म्हटलं की तो चोर पळून जायचा. आता चोरच अभिमानाने सांगतो आहे की तो चोर आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती. त्यामुळे एक प्रकारची विचित्र अशी ही निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा होता. पण आता राजकारणाचं विद्रुपीकरण करुन ठेवलं आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी झी २४ तास या वाहिनीवरील टू द पॉईंट मुलाखत विशेष कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे.
भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष नाहीच, सत्तावादी पक्ष आहे- उद्धव ठाकरे
भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष नाहीच. भाजपा हा सत्तावादी पक्ष आहे. जनसंघ हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सर्वात शेवटी सहभागी झाला आणि सर्वात आधी बाहेर पडला. काही ओरपायला मिळालं तर बरं या दृष्टीने जनसंघ चळवळीत आला होता. कारण यांचा (भाजपा) डीएनए हा संधीसाधूपणाचा आहे, वरुन साधू असल्याचा आव फक्त ते आणत आहेत बाकी काही नाही. सत्तेसाठी कुणाशीही युती करायला ते तयार आहेत. गुंड वगैरे कुणाशीही युती करणं सुरु आहे. भाजपा हा एक पेशीय अमिबा सारखा वाढत चालला आहे. त्याला सगळं पाहिजे, हिंदुत्व वगैरे काहीही नाही ते काहीही करत आहेत. एमआयएम बरोबर अकोट मधली युती करणं हा भाजपाचा लव्ह जिहाद आहे. भाजपाचे मंत्री गोमांस खातात आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. महापालिकेत हिंदू-मुस्लिम हा मुद्दा नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
घाटकोपरची भाषा गुजराती आहे हे ऐकून घ्यायचं?
आम्ही सांगतो आहे, आमचा महापौर मराठीच होईल. हिंदू म्हणून आम्ही एकत्र होतो, मुंबईवर आणि आपल्यावर ते हिंदी सक्ती करायला लागले. त्यांचे ते कुणीतरी नेते येऊन काय बोलले? घाटकोपरची भाषा गुजराती आहे हे ठरवणार आणि आपण ऐकून घ्यायचं? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. भाजपाने मुंबईला तीन लाख कोटींच्या खड्ड्यात घातलं आहे, मुंबईला लुबाडण्याचं काम चाललं आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
मराठी माणसांवर दादागिरी सुरु झाली आहे
मुंबईमधे गेल्या दोन ते तीन वर्षांत मराठी माणसांवर दादागिरी सुरु झाली. देशातलं एक राज्य दाखवा जिथे मराठी माणूस दादागिरी करतो आहे. घर नाकारलं जातं, आहारावरुन ऐकावं लागतं आहे. जो मराठी माणूस जिथे गेला तिथला बनून राहिला आहे. आमच्याच घरात येऊन आमच्यावर दादागिरी करायला लागले आहेत त्याला आमचा विरोध आहे. यांचे शेठ दिल्लीत बसले आहेत म्हणून यांची मस्ती वाढली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
