आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती. यावरून राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट लिहित विश्वास नांगरे पाटलांचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य करत विश्वास नांगरे पाटलांना खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्वास नांगरे पाटील हे संघाच्या कार्यक्रमाला जातात, यात चुकीचं काय? असं म्हणत त्यांचं समर्थन केलं. तसेच उद्धव ठाकरेंनाही संघाच्या शाखेत जाण्याचा सल्ला दिला. यावरून उद्धव ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देत विश्वास नांगरे पाटलांनाही खडेबोल सुनावले. ‘विश्वास नांगरे पाटलांनी मग शिवसेनेच्याही शाखेत यावं’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही देशद्रोही संघटना नाही. देशप्रेम शिकवणारी आणि मातृभूमी ही माझी आई आहे, असं मानणारी ही संघटना आहे. आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत, आम्ही वर्षाच्या सहा उत्सवाला जातो, आम्ही दंड घेऊन संचालनात उतरतो. यात चुकीचं काय?. विश्वास नांगरे पाटील यांनाच नाही, तर यांनाही (उद्धव ठाकरेंना) मी सुचवेन की तुम्ही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जा. तिथे संस्कार मिळतात, शिस्त मिळते. विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जातात, यात काहीही चुकीचं नाही”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विश्वास नांगरे पाटील यांचं समर्थन केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी विश्वास नांगरे पाटील यांचं समर्थन केलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मग विश्वास नांगरे पाटील यांनी शिवसेनेच्या शाखेतही यावं. सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी आणली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना इतिहास थोडासा सांगावा लागेल. हे म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान हवे होते. खरंच ते पंतप्रधान हवे होते. कारण त्यांनीच संघावर बंदी घातली होती”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं.

“…तर सेवेचा राजीनामा द्या”, राज ठाकरे विश्वास नांगरे पाटलांवर संतापले

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. यावरून राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत थेट विश्वास नांगरे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, “आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते, याचं भान पण तुमचं गेलं? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल” अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.