Uddhav Thackeray on PM Modi and Shinde sena MP meeting: “तरुणांना भेटण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना वेळ नाही. पण जे गद्दार आहेत, शिवसेना चोरून शाहसेना ज्यांनी स्थापन केली. त्या गद्दारांना भेटायला पंतप्रधानांना वेळ आहे. पंतप्रधान मोदी या खासदारांना फक्त भेटलेच नाही तर त्यांनी ‘भिऊ नका मी तुमच्या पाठिशी आहे’, असे वचनही गद्दारांना दिले”, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि बंडखोर खासदारांच्या भेटीवर टीका केली.

विद्यार्थी आंदोलनाचा हवाला देताना ते म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात भारतातील जेन-झी पिढीने सरकारला कसे गुडघ्यावर आणले याची चर्चा सुरू आहे. मला एका गोष्टीचे वैशम्य वाटते की, या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावर निर्घृण अत्याचार केले गेले. काही जणांना तर जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण या निमित्ताने झाली. विद्यार्थ्यांचा छळ केल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्याशी बोलायला तयार नाहीत. गृहमंत्र्यांचीही बोलण्याची हिंमत नाही. आज संपूर्ण देश पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागत आहे. एका मंत्र्यांचा राजीनामा घेऊन हे थांबणार नाही, आता संपूर्ण व्यवस्था म्हणजेच सरकार बदलावे लागणार आहे.”

विद्यार्थी आंदोलकांवर अत्याचार केले. त्यांच्यावर लाठ्या चालवल्या, त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे वेळ नाही. पण गद्दारांना भेटून मी तुमच्या पाठिशी आहे, असे आश्वासन पंतप्रधान देत आहेत. खरेतर हे वाक्य त्यांनी आंदोलक तरुणांना बोलायला हवे होते, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पंतप्रधान मोदींचा धमकीवजा संदेश कुणाला?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह मुंबईत असताना शिंदे सेनेच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसेच भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे, असेही म्हटले. पंतप्रधानांचा हा धमकीवजा संदेश कुणासाठी आहे? हा संदेश त्यांनी सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे?”

पंतप्रधान मोदी यांनी शिंदे सेनेच्या खासदारांना जे म्हटले, त्याच्या बातम्या देशभरातील वृत्तपत्रात छापून आल्या आहेत. या सर्व बातम्या आम्ही सर्वोच्च न्यायालयातही सादर करू. ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादीत राहिली नाही. गद्दारीचा व्हायरस संपूर्ण देशात पसरला आहे. पंतप्रधान मोदींनी हा संदेश भविष्यात फुटल्या जाणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही दिला आहे का? तुम्ही आमच्याबरोबर या तुमचे काहीही वाकडे होणार नाही, हा संदेश त्यांनी दिला आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.