गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाचं रविवारी अर्थात ११ डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं उद्घाटन होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, उद्घाटनाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर खोचक शब्दांत तोंडसुख घेतलं आहे. घनसावंगीमध्ये भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यावरून सरकारवर टीकास्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रावर मोदींनी बोललंच पाहिजे”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. “पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“माझी पंतप्रधानांना विनंती आहे की…”

“उद्या मोदी येतायत समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला. उद्या ते राज्यपालांच्या सगळ्या वक्तव्यांवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतील की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते वगैरे. बाळासाहेब कसे होते वगैरे बोलून आम्हाला टोमणे मारतील. कारण त्या महामार्गाचं नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्यावर कदाचित ते बोलतील. माझी त्यांना विनंती आहे. बोला, तुमचा अधिकार आहे. पंतप्रधान म्हणून तुम्ही देशाचे पालक आहात. पालकासारखं बोला. पण महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे असं बोलू नका. कुणीही यावं आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही काही मिंधे नाही आहोत. जे होते, ते मिंधे तिकडे गेले”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावरही खोचक टीका केली.

“…आणि मग बाळासाहेबांचं नाव असलेल्या मार्गाचं उद्घाटन करा”

“समृद्धी महामार्ग झालाच पाहिजे. पण एका मोठ्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकचा रस्ता कर्नाटक जर महाराष्ट्रासाठी बंद करत असेल, तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात? आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहात? हे आधी बोला आणि मग शिवसेनाप्रमुखांचं नाव असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा. कारण स्वत: शिवसेनाप्रमुख सीमाप्रश्नासाठी तीन महिने तुरुंगात राहिले होते. शिवसेनेची भूमिका बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही आहे. आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणवणाऱ्या लोकांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट झालं पाहिजे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams pm narendra modi samruddhi mahamarg inauguration pmw
First published on: 10-12-2022 at 13:32 IST