खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका झाली. इतकंच नाही तर पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कारही घातला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवीगाळ करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी माध्यमांसह संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विमानात उच्चस्तरीय चर्चा झाली त्याचा तपशील लवकरच समोर येईल असं सूचक वक्तव्यही केलं आहे.
शिवीगाळ करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही-उद्धव ठाकरे
शिवसैनिक आणि पत्रकार माझ्याबरोबर आहेत. आपण सगळे मागचे काही दिवस पाहतो आहोत की काय प्रकारची भाषा वापरली जाते आहे. मला लाज वाटते आहे की बुरखे पांघरुन हे लोक माझ्याबरोबर राहिले कसे? असभ्य वागणूक लोकांकडून पत्रकारांना मिळाली हे आपल्याला संस्कृतीला शोभणारी नाही. कुणाला राग आला तर राग व्यक्त करण्याची भाषा असू शकते पण शिवीगाळ करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकूणच काय तर आजपासून तर आजपासून मी या गद्दारांच्या मतदारसंघातील माझ्या कट्टर, कडवट शिवसैनिकांना भेटण्यासाठी जातो आहे. शिवसेनाप्रमुखांचा चेहरा पाहून आणि मशाल बघून ज्या मतदारांनी या गद्दारांना निवडून दिलं त्यांची माफी मागायला मी जातो आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
खासदारांना फुटल्यावर किती निधी मिळाला याचा अंदाज लावला जाऊ शकतोच-उद्धव ठाकरे
फुटीसाठी निधी मिळाला आहे हे खासदारांनी मान्य केलं आहे. ५० खोके एकदम ओके ही घोषणा आमदार फुटल्यानंतर गाजली होती. विदर्भात तर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांवरही ते लिहिलं गेलं होतं. आता आमदार फुटताना ५० कोटी दिले गेले असतील तर खासदारांना किती दिले गेले असतील याचा अंदाज लावू शकतो. ज्यावेळी आमचे खासदार निवडून आले तेव्हा मीच दौरा केला होता आणि माझ्याच शब्दावर हे सगळे खासदार निवडून आले होते. बेंबीच्या देठापासून जे बोंबलत आहेत की आता दौरा करुन फायदा नाही त्यांना मी सांगू इच्छितो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमच्या भरवशावर जे खासदार निवडून आले त्यांना प्रचंड हमीभाव आहे आणि शेतकऱ्यांना अजिबात हमीभाव नाही.
मुख्यमंत्र्यांबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानात उच्चस्तरीय चर्चा झाली. हा योगायोग म्हणायचा का? हा प्रश्न विचारला असता येत्या काही दिवसात तुम्हाला सविस्तर वृत्तांत कळेल असं सूचक उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
