मुंबईतून ठाण्यापर्यंत मी चांगल्या वेगात आलो, पण ठाण्यात आल्यावर वेग मंदावला. तसा वेग मंदावणारा कुणी जन्माला आलेला नाही. पण ठाण्यात आल्यानंतर ट्रॅफिकमुळे वेग मंदावला. आपलं एकेकाळचं ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणारं होतं. आत्ताचं ठाणं कंत्राटदारांचं ठाणं आहे. त्या भ्रष्टाचाराविरोधात सोमवारी मोर्चा असणार आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मला पश्चात्ताप होतो आहे की अनंत तरेंचं ऐकलं असतं तर..
आज अनंत तरेंची आठवण येते आहे. मला वहिनी म्हणाल्या की ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. मी म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता. काहीवेळा प्रामाणिकपणे अनेकजण गोष्टी सांगत असतात. पण निष्ठेचे मुखवटे घालून बसलेली माणसं आपल्या आजबाजूला इतका वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरीही आपल्या लोकांकडे दुर्लक्ष होतं. आता मला नाही म्हटलं तरी पश्चात्ताप होतो आहे. तेव्हाच मी अनंत तरेंचं ऐकलं असतं तर आत्ता जरा कुठे गळ्याशी येतं म्हटल्यावर अमित शाह यांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा म्हणत हंबरडा फोडत बसणारी माणसं दिसली नसती. असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
२०१४ लाच भाजपाला शिवसेना संपवायची होती-उद्धव ठाकरे
अनेकदा अशी स्थिती असते २०१४ ला अनंत तरे उभे राहणार होते. अचानक भाजपाने युती तोडली त्यावेळी विधानसभेला. त्यावेळीच शिवसेना संपवण्याचा डाव होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले. तेव्हा अनंत तरेंनी अपक्ष अर्ज भरला होता. मला सगळ्यांनी सांगितलं की तरे ऐकत नाहीत. लोटांगणवीर आले मला म्हणाले काहीही करा नाहीतर सीट जाणार, मग मी तरेंना मी समजावून सांगितलं. आपण भाजपाचं संकट दूर करु, ते आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यानंतर मानपान पाहू. तेव्हा मला अनंत तरे यांनी मला सांगितलं होतं की हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. अनंत तरे यांनी जे सांगितलं होतं ते घडलं. अनंत तरे नावाचा राजहंस आपल्यात असता तर हे कावळे फडफडले नसते. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
गद्दारांना क्षमा नाही हे याच ठाण्यात घडलं होतं-उद्धव ठाकरे
गद्दारांना क्षमा नाही, गद्दारी केली गेली त्याच ठाण्यात नगरसेवकांचे राजीनामे शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती. त्या आठवणींची पुस्तकं पानं मला चाळायची आहेत. अनंत तरे यांनी खूप महत्त्वाचं काम केलं होतं. आनंद दिघे, वसंतराव मराठे, मो.दा. जोशी, प्रकाश परांजपे ही सगळी माणसं आपल्या सोबतीला असती तर कुणाची हिंमत होती गद्दारीतला ग उच्चारण्याची? आनंद दिघे, अनंत तरे आणि आमचं ठाकरे कुटुंब आमचं दैवत एकच एकवीरा आई. तरे जेव्हा तिथे अध्यक्ष झाले आणि आम्ही जाणार असू आमच्या आधी तरे तिथे पोहचलेले असायचे अशी आठवण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितली. शिवसेना उपनेते दिवंगत अनंत तरे ह्यांच्या जीवनावर आधारित त्यांचे सहकारी योगेश कोळी ह्यांनी लिहिलेलं ‘अनंत आकाश’ ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. ज्यात एकनाथ शिंदेंविरोधात टोलेबाजी केली.
