ऑपरेशन टायगर राबवलं गेलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले अशी चर्चा आहे. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाष्य केलं. ऑपरेशन टायगर वगैरे करुन अशा प्रकारे खासदार किंवा आमदार फुटत असतील तर आम्हालाही ऑपरेशन कमळ राबवावं लागेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी?

फोडून फोडून असं सगळं करण्यापेक्षा आम्हाला बोलवा, आम्ही काय पाकिस्तानी नाही. माझ्या घराण्याला इतिहास आहे. तुमच्या घराण्याचा असेल तर तुम्ही सांगा. आम्हीही देशप्रेमी आहोत तुमच्यापेक्षा कांकणभर जास्त देशप्रेमी आहोत. हे तेच लोक आहेत ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना विरोध केला. हे हिंदुत्व गोमूत्रधाऱ्यांचं नाही, हे यांचं (भाजपा) भोंदुत्व आहे. वारकऱ्यांचा, छत्रपतींचा भगवा आहे. जो भगव्यात भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. भेसळयुक्त रक्ताने भगवा हाती घेऊ नये. ज्या पद्धतीने देशाचं राजकारण चाललं आहे जनतेचा विश्वास उडत चालला आहे. सोशल मीडियावर कार्टून आलंय. सोनं चोराला पोलिसांनी पकडलं आहे. तो चोर त्यांना सांगतो चोरी म्हणू नका ऑपरेशन गोल्ड म्हणा. डॉक्टर आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. हे असं होणार असेल तर तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. असंच चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चालला आहे.

मी भाकित वगैरे करणारा नाही-उद्धव ठाकरे

मी काही भाकित करणारा वगैरे नाही, ज्योतिषावर तर माझा अजिबात विश्वास नाही. तुम्ही जे समोर दिसत आहात तेच भवितव्य आहात. ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं आणि मानलं जातं त्या देशाचं भविष्य काय असणार? वाट्टेल ते करुन निवडणुका जिंकल्या जात आहेत आणि पदं मिळवली जात आहेत. तुमच्याकडे बहुमत आहे तरीही स्थानिक स्वराज्य संस्था आणखी काही असेल तर पलिकडून कुणाला अर्जच करु द्यायचा नाही. अर्ज भरला रे भरला की उचल त्याला हे काय चाललंय? कशासाठी हे करताय? हे सगळं मिळवून तुम्ही काय करणार आहात देशाचं? नड्डा बोलले होते एकच पार्टी राहिल. वन नेशन वन इलेक्शन हा एक भाग पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शनकडे चालली आहे. एकच पार्टी आणि सगळं काही आमचं, हे यांचं चाललं आहे.

भाजपाला माझा प्रेमळ सल्ला आहे..

भाजपाही कधी काळी आपला दोस्त होता. त्यांना एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते समजतो त्यांना तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालं नाही, तर त्या वयातली मुलं त्यांनी क्रांती केली म्हणून स्वातंत्र्य मिळालं आहे. आत्ता ही मुलं जर का पेटून उठली तर तुमचं सरकारही राहणार नाही. खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, भगत सिंग, राजगुरु यांची वयं काय होती? आत्ताचा जो शब्द आहे ना जेन झी त्या वयोगटातली ही मुलं होती. ती काय बेकार होती का? देश गुलाम आहे मेलो तरी बेहत्तर मी देश स्वतंत्र करेन. देश म्हणजे कोण? तर आपण. चला एक विचार करुन चालतो यापुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही. काय करतील? मेहनत तुम्ही आम्ही करायची आणि यांचे खोक्यावर खोके. शेतकऱ्याला हमीभाव नाही, खासदारांचा-आमदारांचा हमीभाव ठरलेला आहे.