मुंबई: कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील मोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली असता ठाकरे यांनी या मोर्चात शिवसेना (ठाकरे) रस्त्यावर उतरून सहभागी होईल, असे जाहीर केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
बैठकीची माहिती देताना राजू शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून पाठिंबा देणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले असल्याचे सांगितले. आंबा, काजू उत्पादनक शेतकरी आणि मचछीमार हे कोकणचा कणा आहेत. हे सध्या संकटात आहेत. चालू वर्षी आंब्याच्या मोहोर गळती झाली. अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, किटकनाशकावरील वाढता खर्च या सर्व घटकांमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
आंबा संशोधन, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशाेधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. पण राज्यातील कृषी, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. कोकणातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी येथून सायंकाळी ४ वाजात मोर्चा वर्षा निवासस्थानाकडे काढण्याचे निश्चित करण्यात आले.
या मोर्चात शिवसेनेसह, मनसे, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. या बैठकीवेळी खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते विनायक राऊत, माजी खासदार बाळ माने, माजी आमदार वैभव नाईक, गणेश गावकर, किरण टेंभुलकर, सुशांत नाईक, अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार व शेतकरी उपस्थित होते.
