उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आहेत. ज्यानंतर उद्धव ठाकरे सहा खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. हिंगोली या ठिकाणी गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नागेश पाटील आष्टीकर यांचा उल्लेख गद्दारांचा सरदार असा केला. तसंच ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही हे ऑपरेशन देवेंद्र असू शकतं, अशी शंकाही आपल्या भाषणात उपस्थित केली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिंधे सेना म्हणत जोरदार टोलेबाजीही केली.

शिवसेना कुणीही संपवू शकत नाही-उद्धव ठाकरे

शिवसेना कुणी संपवू शकत नाही हे या गद्दारांना कळलेलं नाही. मिंधेसेना नमकहराम आहे, कारण ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले कारण तुमच्यासह सगळ्यांनी त्यांच्यावर उपकार केले. त्यांच्याशी यांनी दगा केला. स्वतः खोक्यांसाठी जे खोक्यात गेले त्यांनी आपला धोका केला आहे. काही लोक मला सांगत होते हा फुटणार, मी नाही म्हटलं होतं. आता हा नुसता फुटला नाही तर गद्दारांचं नेतृत्व करणारा हा निघाला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नागेश पाटील आष्टिकरांना गद्दारांचा गद्दार असं म्हटलं आहे. लोकसभेच्या खासदारांची बैठक बोलवली होती तेव्हा तीन खासदार आले होते. यवतमाळच्या खासदारांनी मला फोन केला आणि सांगितलं मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत सोयरीक जुळवायची आहे. पण मला काय माहीत ते मुलीची सोयरीक जुळवत नव्हते स्वतःचा भाव वाढवत होते. इथला खासदारही हरामखोर निघाला असंही आष्टीकर यांच्याबाबत उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

नागेश पाटील आष्टीकरच्या रक्तात गद्दारी-उद्धव ठाकरे

नागेश पाटील आष्टीकर याच्या रक्तात नालायकपणा भिनला आहे. गद्दारी यांच्या रक्तात आहे, नागेश पाटील आष्टीकर हे बुजगावणं होतं. पण वाघाचं कातडं पांघरलेले हे लांडगे होते, कोल्हे होते, गाढवं होती त्यांना आपण काय प्रेमाने डोक्यावर घेतलं होतं. पण हे लायकीचे लोक नाहीत. परभणी आणि हिंगोलीचा इतिहास मला इथे हवा, जो गेला तो संपला. राजकारणातून त्याला (नागेश पाटील आष्टीकर) बाद करायचा. विकास निधी पाहिजे वगैरे सांगतात. विकास निधी कसला? विमानात बसलेत, कुठून आणला पैसा? मोदीबाबा सांगतात सोनं खरेदी करु नका, कुणाला सोनं खरेदी करता येतं आहे? खासदार का खरेदी का करता आहात? त्यांना काय गळ्यात घालून हिंडायचं आहे का? असे कठोर सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.

हे ऑपरेशन देवेंद्र तर नाही ना?

मिंधेचं भवितव्य शून्य आहे, काम संपलं की मिंधेलाही फेकून देणार आहेत हे लोक. हे सहा खासदार भाजपात जाण्याऐवजी मिंधेकडे का गेले? हे पण मोठं कोडं आहे. ऑपरेशन टायगर वगैरे म्हणत आहेत, पण टायगरवर कुणी ऑपरेशन करु शकत नाही,कारण वाघाने एक पंजा मारला तर सगळी आतडी बाहेर येतील. मला तर वाटतं आहे की हे ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे उद्या पंतप्रधान होऊ शकतात म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप, महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीत पोहचता कामा नये म्हणून अमित शाह यांनी सहा खासदार मिंध्याकडे पाठवले आहेत असा माझा समज आहे. कशासाठी माझे खासदार फोडले? तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, जो तुमचा बटिक आहे त्याच्याकडे हे खासदार सरकवले आहेत. तुम्ही पंतप्रधानपदी कुणाला मत द्याल? तर अमित शाह यांना मत देतील म्हणून ही फोडाफोडी चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.