माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सण-उत्सवाच्या काळात लावले जाणारे डीजे, होणारा गोंगाट यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रत्येकालाच सण-उस्तव हवे आहेत. पण कोणालाही गोंगाट नको आहे, असे मत ठाकरेंनी व्यक्त केलं. त्यांनी डीजे बंदीला पाठिंबाच दिलाय. त्यांनी मोदींचा फोटो हटवण्याचेही समर्थन केले आहे. काहीही झालं तरी महापुरुषांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो नकोय, असे ते म्हणाले आहेत. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?
आम्हाला आमचं नाव आणि चिन्ह मिळायला पाहिजे यासाठी केसच व्हायला नको होती. आमची घटना आहे का वगैरे निवडणूक आयोग तपासत आहे. जे सहा राजकीय पक्ष बोगस निघाले, ज्यांची कार्यालयं नरोडामध्ये आहेत. त्या कागदी पक्षांकडे ६२० कोटींची मालमत्ता आहे. या पक्षांची घटना निवडणूक आयोग तपासतोय का? की देणगीत निवडणूक आयोग भागिदार आहे असं म्हणू शकतो का? अशी वेळ असताना आम्ही हे म्हणतोय की दोन मोठ्या निवडणुका झाल्या, महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे कपिल सिब्बल म्हणाले की जर कोणत्याही कारणाने निकालाला उशीर लागत असेल तर तुम्ही धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाका. कारण ज्याचा दुरूपयोग करुन त्या लोकांनी सत्ता मिळवली, गैरकारभार केले. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, नाव चोरलं. चोर लोकांना माहीत आहे त्यामुळे त्यांना चोरीचा माल वापरु देऊ नका. हेच आमचं म्हणणं आहे.
कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात काय म्हणाले होते?
शिवसेना कुणाची? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असाताना कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. तसंच धनुष्यबाण आम्हाला मिळणार नसेल तर ते चिन्ह गोठवा असंही कपिल सिब्बल म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची चर्चा झाली होती. आता याबाबतच प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंं आहे.
एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
एकनाथ शिंदे जे काय म्हणाले चिन्ह गोठवणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणं आहे ते जाऊ द्या. कारण ते गोठलेल्या मनाचे आहेत. त्यांना गोठ्यामध्ये न्या असं मी म्हणणार नाही कारण गोठ्यातली जनावरंही माणसाच्या उपयोगी पडतात. गोठलेल्या मनाच्या चोर मंडळींना धनुष्य बाणावर बोलण्याचा अधिकारच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
