मुंबई : ‘माणूस आपल्याबरोबर असल्यावर त्याची किंमत कळत नाही. अजित पवार यांनीही अलीकडेच केलेल्या विधानात ७० हजार कोटींचे आरोप केले त्यांच्याबरोबरच सत्तेत बसलो, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कुणाला आयुष्य नकोसे येईल इतके बदनाम करायला नको.

महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, राजकारण नाही, मर्यादा पाळायला हव्यात. पण बदनामीनंतरही अजित पवार खचले नाहीत. आपल्या कामातून त्यांनी आरोपांना असे उत्तर दिले की आरोप करणाऱ्यांनाच त्यांना सहकारी म्हणून सत्तेत घ्यावे लागले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत मांडलेल्या शोकप्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एखादी व्यक्ती जिवंत असताना आपण तिला इतके बदनाम करतो की त्याला जीव नकोसा करून टाकतो. मात्र ती व्यक्ती आपल्यातून गेल्यावर तीच व्यक्ती आपली वाटायला लागते. त्यामुळे आपण सगळ्यांनी काही मर्यादा पाळायला हव्यात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपण ज्याला बदनाम करतो, तोदेखील एक माणूसच आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

किती आरोप झाले तरी अजित पवार कधी खचले नाहीत. अजितदादांच्या रूपाने आपण एक विश्वासू सहकारी आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री असताना बारामतीत अजित पवारांबरोबर बारामतीला गेलो हाेतो. तेव्हा त्यांनी तिथला कायापालट उत्साहाने दाखवला होता. पण या दुर्घटनेनंतर जेव्हा मी बारामतीत गेलो तेव्हा बारामती पोरकी झालेली वाटली. त्यांची वेळ आणि कामाची शिस्त जबरदस्त होती. म्हणूनच त्यांना घड्याळाची निशाणी मिळाली. त्यांच्यासमोरचे टेबल, पेन, कागद हे व्यवस्थित काटकोनात असायचे. हीच शिस्त आणि सवय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

नेहमी सभागृहात दिसणारे अजितदादा आज नाहीत, ही खंत सगळ्यांच्या मनात आहे. माझ्या कारकीर्दीची सुरुवातही त्यांच्या विचारधारेच्या विरोधातली होती, आम्ही कधी एकत्र येऊ असे ध्यानीमनीही नव्हते. त्यात त्यांची एक सकाळ ही त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि आताची ही दुसरी सकाळ महाराष्ट्राच्या अंत:करणाला चटका लावणारी ठरली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

करोना काळातही त्यांनी राज्याचे अर्थचक्र थांबू दिले नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर शासकीय व प्रशासकीय कामकाजात अजित पवारांचा पाठिंबा व खंबीर आधार मिळाला. सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांनी एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र काही जणांना आयुष्यभर मोठ्या वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री झाले असते – एकनाथ शिंदे

राजकारणात मतभेद आणि वाद असले तरी अजित पवार हे अजातशत्रू होते. राजकारणात त्यांनी खिलाडूपणा जपला होता. दुर्दैवाने दादांना मुख्यमंत्री होता आले नाही. नशिबाची साथ मिळाली असती तर भविष्यात दादा नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे.

दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मृत्यूचे सत्य समोर यायला हवे – अमोल मिटकरी

विमान अपघाताने महाराष्ट्राच्या मनात शंकेचे काहूर निर्माण झाले आहे. त्यांच्याबरोबर ९-१० वेळा आपण स्वत: विमानाने प्रवास केला आहे. दादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते. ही माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळे अपघाताचे सत्य काय हे महाराष्ट्रासमोर यायला हवे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. घरात कोणतीही कारकीर्द नसताना ग्रामीण भागातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातात अजित पवार यांनी पेन दिले, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण! – शशिकांत शिंदे

पुरोगामी विचारांची परंपरा जपताना अजितदादांनी कायम यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी तडजोड केली नाही. भविष्यातील समीकरणे घडविताना दादा अनेकदा उपमुख्यमंत्री झाले. एकवेळ मुख्यमंत्री होण्याची त्यांना संधी होती, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणे ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी सदस्य विक्रम काळे, अभिजीत वंजारी, संजय खोडके, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, भाई जगताप, अभिजीत वंजारी, शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे, ठाकरे गटाचे सचिन अहिर आदी सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.