Uddhav Thackeray farewell speech : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील कार्यकाळ संपत आला असून आज त्यांनी निरोपाचे भाषण केले. यावेळी त्यांनी २०१९ साली मुख्यमंत्री पदाची अचानक पडलेली जबाबदारी आणि अचानपणे या जबाबदारीतून पायउतार झाल्याचे अनुभव व्यक्त केले. तसंच, राज्यातील कवींच्या कविता सभागृहात वाचून दाखवत राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांच्या खुमासदार शैलीत भाष्य केलं.

ऐसी कौनसी बात थी…!

“विधान परिषदेत का यावं? सहा वर्षे यावं की नाही यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निरोपाच्या वेळी यावं. कारण आपल्याविषयी ऐकायला मिळतं. तुमच्या मनात काय होतं, हे यादिवशी कळतं. तसं पाहिलं तर मुख्यमंत्री बोलले ते अगदी खरं आहे. माझा पिंड राजकारणाचा नाही. माझा मूळ स्वभाव कलाकाराचा आहे. मला तुम्ही इतकं जवळून ओळखता म्हटल्यावर ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मिश्किलीत विचारला.

मुख्यमंत्री पद अचानक आलं अन् अचानक गेलंही

“मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयातील प्रवेश मला आजही आठवतो. संपूर्ण मंत्रालय बहरून आलं होतं. खिडक्यांतून लोक डोकावत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो आनंद पाहून मी तो क्षण विसरू शकत नाही. त्या नंतर दिवस पटपट निघून गेले. ज्या दिवशी मी वर्षा सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र पाहून मी गहिवरून गेलो होतो. हे सर्व प्रेम महाराष्ट्राने दिलं. हे असं प्रेम थोड्या लोकांच्या नशिबात येतं. मला आठवतं, वर्षा सोडलं आणि मातोश्रीत आलो. मुख्यमंत्री पद सोडलं नव्हतं. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री पद सोडलं. मी घरी बसून कारभार करत होते. काही अधिकारी आणि मंत्री घरी यायचे. सरकारी काम थांबू शकत नव्हतं. मी हसत खेळत चर्चा करत होतो. एका अधिकाऱ्याने विचारलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्ही जसे होतात तसेच आजही आहात. हे कसं काय? जे आपलं नसतं ते स्वीकारण्यात आनंद होण्याची गरज नसते. त्यामुळे जे आपलं नसतं ते सोडण्यातही दुःख होण्याची गरज नसते. त्यामुळे मुख्यमंत्री पद जसं अचानक आलं तसं ते अचानक गेलं. मी माझ्या घरी आलो. त्यामुळे माझा घर आणि त्या घरातील आनंद प्रत्येकासाठी असतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“योगायोग आणखी एका गोष्टीचा आहे. आज २४ मार्च. ६ वर्षांपूर्वी याच दिवशी मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याचा आजचा सहावा स्मृतीदिन. म्हणजेच, जिथून काम सुरू झालं, त्यादिवशी मी आज निरोप घेत आहे. हा कालखंड विचित्र होता. योगायोग आणखी एका गोष्टीचा आहे. माझ्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत, पहिला निर्णय घेतला तो म्हणजे रायगडाला निधी देण्याचा निर्णय घेतला होता. शेवटचा निर्णय औरंगाबादचं संभाजीनगर नगर असं नामांतर करण्याचा निर्णय. हे नामांतर करून मी माझी (मुख्यमंत्री पदाची) कारकिर्द संपली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

…म्हणून अजित पवारांबरोबर स्नेह वाढला

“प्रत्येक प्रकल्पात अजित पवारांनी खंबीर साथ दिली. त्यांचं सहकार्य मी कधीच विसरू शकत नाही. आमचा स्नेह त्यामुळेच वाढला. माझ्या आठवणीत कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि दादांनी पैसे दिले नाहीत. अजितदादा मजबूत खांबासारखे माझ्या पाठिशी राहिले”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांची आठवण काढली.

आता तरी विरोधी पक्ष नेते करा

विठ्ठलराव हांडे शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार होते. गुजरातच्या शेतकऱ्याच्या तांदळाला जास्त भाव मिळतोय पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून त्यांनी लढा उभा केला होता. त्यांच्याकडेही तेव्हा पुरेशी सदस्य संख्या नव्हती. तरीही त्यांना विरोधी पक्षनेता केलं होतं. त्यामुळे आताही तसंच करा”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाता जाता विधिमंडळातील रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर भाष्य केलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात काही कवींच्या कविताही वाचून दाखवल्या.