“यावेळीही कोकणवासीयांची बिस्कीट आणि मेणबत्त्यांवर बोळवण करू नका”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली

CM Uddhav Thackeray visited the flood-hit village today Keshav Upadhye says
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा का होईना दौरा काढला हे चांगलं केलं, पण मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल याचीही काळजी घ्या. या संकटात विरोधीपक्ष म्हणून सोबत आहोत.”

गेल्या दोन संकटात सरकारने पूर्ण निराशा केली

“गेल्या दोन संकटात सरकारने पूर्ण निराशा केली आहे. कोकणावर आलेले संकट खुप मोठे आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. कोकणाला गेल्या दीड वर्षांत निसर्गाने भयानक फटके दिले आहेत. आधी निसर्ग वादळाने सारे काही जमीनदोस्त केले, मग तोक्ते वादळाने पुरते उद्ध्वस्त करून टाकले, आणि त्यातून जे काही बचावले, ते महापुराने धुवून नेले. अतिवृष्टीमुळे मालमत्ता, घरेदारे होत्याची नव्हती झाली. निसर्ग वादळाच्यावेळी मदत मिळालीच नाही हे तोक्ते वादळाच्या वेळी लक्षात आले होते. तोक्तेच्या वेळची मदत अद्याप मिळालेली नाही”,असे केशव उपाध्ये म्हणाले.

दुर्घटनाग्रस्त तळीये गावास भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्याला आक्रीत म्हणावं तसं घडतय, अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो. त्यामध्ये देखील सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं आक्रीत घडतं हे बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने केवळ विचार करणार नाही, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकणी पुनर्वसन करू.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uddhav thackeray visited the flood hit village today keshav upadhye says srk

ताज्या बातम्या