मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात आणि लोकशाही तथा संविधानाच्या रक्षणासाठी आज मुंबईत ‘गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धोरणांवर सडकून टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्तीच कशी गैर आहे हेदेखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. एवढंच नाही तर त्यांनी मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली.
देशात मेक इन इंडिया हुकूमशहा बनणार असेल तर त्याला गाडलंच म्हणून समजा-उद्धव ठाकरे
मला आठवतं आहे की पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली होती. आम्हाला ती घोषणा मान्य आहे. पण हुकूमशहाही मेक इन इंडिया असेल तर त्याला गाडून टाकण्यासाठीच आम्ही इथे उभे राहिलो आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बाकी सगळं मेक इन इंडिया ठीक आहे. पण हुकूमशाहा बनत असाल तर तुमची हुकूमशाही गाडून टाकली असं समजा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. संपूर्ण देशातून या सगळ्यांनी मिळून १३ कोटी मतदार वगळून टाकले आहे. म्हणजे महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मतदार यांनी वगळले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? असा संतप्त सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला.
ज्ञानेश कुमार म्हणजे भाजपाचं हत्यार-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत आपण देखील भाजपसोबत वाहत गेलो होतो. मग त्यांनी काँग्रेस एवढा भ्रष्ट सरकार नाही, असं वातावरण केलं. पण आता संपूर्ण इंडिया उभा राहिलेला आहे, इंडिया अगेन्स्ट व्होट चोर. १३ कोटी मतदान तुम्ही अचानक गाळत आहात. बंगालमध्ये आतापर्यंत अवैध ठरलेल्या अर्जांची छाननी झाली, त्यातल्या काही लोकांना वैध ठरवले गेले आणि ती सुनावणी तिकडे सुरू आहे, पण उरलेल्या मतदारांची छाननी होऊन तो निकाल किंवा तपास पूर्ण व्हायला जवळपास १४६ महिने लागतील. हे प्रकरण इथपर्यंत थांबत नाही.
भाजपाला सरकार चालवताच येत नाही-ठाकरे
भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत आहात, त्याला सरकार चालवणे नव्हे, तर सूड उगवणे म्हणतात, अशी टीका त्यांनी केली. ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. मतदानाचा अधिकार हे लोक काढून घेत आहेत. या संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या असतील, प्रशासन तुम्ही ताब्यात घेतले असेल, पण हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यावर उद्या तुम्हाला फिरणे मुश्किल होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.
