उदगीर शहरातील डॉ. झाकीर हुसेन चौकात शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर अचानक वाहने थांबली. बसमधून माणसे लगबगीने बाहेर पडू लागली. मोठा गोंधळ झाला. धावत्या राज्य परिवहन मंडळाच्या गाडीतून धूरच धूर बाहेर येऊ लागला. प्रसंगावधान राखत वाहन चालकाने गाडी थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

राज्य परिवहन मंडळच्या धूर वाढत असल्याचे लक्षात येताच जवळील पेट्रोल पंपावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यात आली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, चालकाची सतर्कता आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. वाहनचालकाने सांगितले, डिझेलच्या टाकीचा पाईप फुटल्याने ही घटना घडली. पण आधी प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची मानून प्रत्येकाला गाडीतून बाहेर काढले.

मराठवाड्यातील तापमानात मोठी वाढ होत आहे. ४२ अंशापर्यंत तापमान वाढत असल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या इंजिनवरही होत आहे. त्यामुळे आगाराबाहेर गाड्या काढताना त्याची तपासणी आधी करावी अशी मागणी केली जात आहे.

डिझेलचाही तुटवडा

राज्यातील अनेक भागांप्रमाणे लातूर जिल्ह्यातही सध्या डिझेलचा तुटवडा तीव्र जाणवत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनचालक आणि मालवाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी डिझेल काळा बाजाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीदरम्यान ट्रक मधून डिझेल काढून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.  निलंगा तालुक्यात अशाच प्रकारे ट्रकमधून डिझेल काढून विक्री केली जात असल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.