Shiv Sena MP defection Eknath Shinde breaking news live update:उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा खासदार आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बंडखोरी केलेले ६ खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः यासंदर्भात मोठी माहिती दिली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आठवड्याभरापूर्वीच झाला होता निर्णय!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ६ खासदारांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय आज नाही, तर एक आठवड्यापूर्वीच घेतला होता. कायदेशीर आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
आमदार प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
“आमच्या ६ खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय एक आठवड्यापूर्वीच झाला होता. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते रितसर पक्षात प्रवेश करतील,” अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार
आज मुंबईत होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ६ खासदारांच्या या ‘एन्ट्री’मुळं संसदेत आणि राज्यातील राजकारणात शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
