अलिबाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्याला युनिक डिसअॅबिलिटी (यूडीआयडी) कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे दिव्यांगांना हे कार्ड आधारशी लिंक करून (ई-केवायसी) पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च आहे. ३१ मार्च पर्यंत यूडीआयडी लिंक न केल्यास लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.
अनेक दिव्यांग व्यक्तींनी अद्याप त्यांचे यूडीआयडी कार्ड आधार क्रमांकाशी जोडलेले नाही. यामुळे शासनाच्या पारदर्शकतेच्या मोहिमेत अडथळे येत आहेत. अपात्र लाभार्थ्यांना चाप बसावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र दिव्यांगाना मिळावा, यासाठी ई-केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक नसेल किंवा ज्यांचे ई-केवायसी प्रलंबित असेल, त्यांचे १ एप्रिलपासून अनुदान बंद होणार आहे.
काय आहे युडीआयडी कार्ड?
केंद्र सरकारद्वारे हे विशेष ओळखपत्र दिले जाते. यामुळे दिव्यांगांना देशभर एकाच कार्डवर सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. यामध्ये दिव्यांगत्वाचा प्रकार, टक्केवारी आणि वैयक्तिक माहिती साठवलेली असते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार लिंकिंग आवश्यक आहे.
प्रशासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेनंतर पोर्टल तांत्रिकदृष्ट्या बंद होऊ शकते, पात्र दिव्यांगांना प्रत्येकी २,५०० रूपयांचे अनुदान मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कार्ड आधार सोबत लिंक करावे लागेल.
कशी करायची ई-केवायसी?
लाभार्थी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करू शकतात. सरकारने ‘ यूडीआयडी ‘ मोबाइल अॅपची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी स्वतःच्या मोबाइलवरून अॅप डाऊनलोड करून आधार क्रमांक अपडेट करू शकतात. मात्र, त्यासाठी आधार, यूडीआयडी कार्ड आणि आधार लिंक मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
