सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पावसाची ओढ आणि लोकप्रतिनिधींनी लावलेला तगादा या पार्श्वभूमीवर, उजनी धरणातून सीना नदीसाठी भीमा-सीना जोडकालव्यातून (बोगदा) अखेर गुरुवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पाणी प्रत्यक्ष सुटण्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये याचे श्रेय लाटण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली असून, समाजमाध्यमातून ‘श्रेयवादाचे लोट’ वाहू लागले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळी ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. सध्या धरणात ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून एकूण साठा ९२ टीएमसीवर पोहोचला आहे. यापैकी उपयुक्त साठा २८.५० टीएमसी इतका आहे. दुसरीकडे, दौंडवरून धरणात येणारा विसर्ग सध्या ४,६०५ क्युसेकवर स्थिरावला आहे. पुणे जिल्ह्याच्या बाजूने पाण्याची आवक समाधानकारक असल्याने सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्त मिटली आहे.
तसेच, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे नीरा नदीत पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी नीर-नरसिंगपूर येथील संगमातून भीमा पात्रात आल्याने आषाढी वारीसाठी उजनी धरणातून स्वतंत्र पाणी सोडण्याची गरज भासली नाही. त्यामुळे शिल्लक पाणी सीना नदीत सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लावून धरली होती.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि राजकीय श्रेयवाद…
नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर बनल्याने लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार नारायण पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे साकडे घातले होते, तर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनीही विखे-पाटील यांच्याकडे सीना-भीमा जोडकालव्यातून पाणी सोडण्याचा आग्रह धरला होता.
या सर्व प्रयत्नांनंतर प्रशासनाने अखेर पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र, आदेश निघताच ‘आमच्याच प्रयत्नांमुळे पाणी सुटले’ असे सांगणारी प्रसिद्धीपत्रके आणि समाजमाध्यमातून विविध नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रसारीत केले जात आहेत. त्यामुळे पाणी सुटण्याआधीच जिल्ह्यात राजकीय श्रेयवादाचे राजकारण तापले आहे.
टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवणार
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा-सीना जोडकालव्याच्या बोगद्यातून सुरुवातीला २०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जाईल. त्यानंतर पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. हे आवर्तन मूळ नियोजनानुसार १५ जुलैपासून सुरू होणार होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यात बदल करून आता ते गुरुवार सकाळपासून प्रवाहित केले जात आहे. या निर्णयामुळे सीना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
