Foreign Fish Removal Campaign in Ujani Dam Maharashtra: उजनी जलाशयातील गोड्या पाण्यातील देशी माशांच्या अस्तित्वाला सध्या परदेशी माशांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश, तिलापिया (ज्याला चिलापी म्हटले जाते) आणि आफ्रिकन कॅटफिश या परदेशी माशांनी उजनीतील स्थानिक जैवविविधता उद्ध्वस्त केली आहे. यामुळे उजनीवर अवलंबून असलेल्या हजारो मच्छिमारांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. या संकटावर मात करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने देशातील पहिली लोकसहभागातून निर्मूलन आणि स्थानिक प्रजातींच्या पुनरुज्जीवनाची मोहीम सुरु केली आहे.
ॲमेझॉन खोऱ्यातून उजनीत कसे आले परदेशी मासे?
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सकरमाउथ कॅटफिश मूळचा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीतील आहे. एक्वेरियमच्या (काचपेटी) व्यापारातून तो भारतात आला. काचपेटी साफ ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा मासा मोठा झाल्यावर किंवा इतर माशांना त्रास देऊ लागल्यावर लोक त्याला नदी-नाल्यांत सोडून देतात.
विचित्र दिसण्यामुळे स्थानिक पातळीवर या माशाला हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखले जाते. स्थानिक माशांची अंडी खाणे, नदीकाठच्या पात्रात आणि मातीच्या बांधांमध्ये बिळे करणे, तळाशी राहणाऱ्या स्थानिक माशांचे अन्न हिरावून घेणे, यामुळे हा मासा प्रचंड विनाशकारी ठरत आहे. तसेच हा मासा मानवाला खाण्यायोग्य नसल्याने मच्छिमार तो पुन्हा पाण्यात फेकून देतात, असेही डॉ. काटवटे यांनी सांगितले.
उजनीत ९७ टक्के परदेशी मासे
उजनीतील जैवविविधतेचे प्रमाण अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. दोन दशकांपूर्वी उजनीत १०० टक्के स्थानिक मासे आढळायचे. मात्र आता उजनीत तब्बल ९७ टक्के परदेशी मासे असून स्थानिक माशांचे प्रमाण अवघे ३ टक्के उरले आहे. या ९७ टक्क्यांपैकी ३० ते ४० टक्के वाटा एकट्या सकरमाउथ कॅटफिशचे आहे.
हा मासा प्रजननासाठी भीमा नदीच्या पात्रात आणि काठांवर मोठी बिळे करतो. यामुळे भीमा नदी पात्राची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून भविष्यात धरणाच्या मातीचा भराव कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भीमाशंकर येथील भीमा नदीच्या उगमस्थानापर्यंत या माशाचा प्रसार झाला असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता यात आहे.

मच्छिमारांवर संकट
उजनी जलाशयावर भिगवण आणि आसपासच्या परिसरातील तब्बल २० हजारांहून अधिक मच्छिमार, व्यापारी आणि कामगार अवलंबून आहेत. मात्र या उपऱ्या माशांमुळे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. भिगवण येथील मच्छिमार भरत मल्लाव यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, सकरमाउथ कॅटफिश वेगळीच डोकेदुखी ठरत आहे. हा मासा जाळ्यात अडकला की काढणे कठीण होते. त्याला काढताना जाळे कापावे लागते. परिणामी दर १५ ते २० दिवसांनी १,५०० रुपये खर्च करून नवीन जाळे घ्यावे लागते.
दलाज येथील मच्छिमार दत्ता पवार यांनी सांगितले की, जाळ्यात अडकलेल्या माशांपैकी तिलापिया आणि सकरमाउथ माशांचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. उरलेल्या २० टक्केमध्ये रोहू, कटला आणि मृगाल असतात. ज्यातून थोडीफार कमाई होते. स्थानिक मासे कमी आढळत असल्यामुळे दोन वर्षांपासून आमचे उत्पन्न कमालीचे घटले आहे.
बीएनएचएसचा अनोखा उपक्रम
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने यावर तोडगा म्हणून भिगवण मत्स्य बाजारात भारतातील पहिले सकरमाउथ कॅटफिस संकलन केंद्र सुरू केले आहे. मच्छिमारांनी हे मासे फेकून न देता जमा करावेत, यासाठी त्यांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. डॉ. काटवटे यांनी सांगितले की, आम्ही लिलावाच्या दराव्यतिरिक्त मच्छिमारांना प्रति किलो २ रुपये अतिरिक्त बोनस देतो. त्यामुळे मच्छिमारांना भिगवण बाजारात सरासरी ३० ते ३५ रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

उजनीतून आतापर्यंत ३६ टनांहून अधिक सकरमाउथ मासे बाहेर काढण्यात आले आहेत. हे मासे तळोजा आणि रत्नागिरी येथील ऑइल मिल्समध्ये पाठवले जातात. जिथे प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या मळीचा वापर वनस्पतींसाठी जैविक खत म्हणून केला जातो.
डॉ. काटवटे यांच्या मते, अमेरिकेतही अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली होती. परंतु भारतात लोकसहभागातून राबवलेली ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे. सरकारने मत्स्यालय व्यापाराकडे लक्ष द्यावे आणि अशा आयातीवर बंदी घालावी, अशीही मागणी त्यांनी केली.
