सोलापूर : पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोलापूरची वरदायनी असलेल्या उजनी धरणामध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत ३८.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये सध्या ८४.१४ टीएमसी पाणीसाठा आहे.
शनिवार पासून भीमा नदीच्या खोर्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी (दि. ८ जुलै) पहाटे धरण मृतसाठ्यातून बाहेर आले. सध्या, दौडवरून धरणात ६८ हजार ३०३ क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने बॅकवॉटर परिसरात पाण्याच्या जवळपास ठेवलेले पाण्याचे पंप, पाइप काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
पाच वर्षांनंतर जुलै मध्ये धरण मृतसाठ्याच्या बाहेर
मागील काही वर्षांपासून सातत्याने मार्च ते मे दरम्यान धरण मृतसाठ्यात जाते. यंदा ६ मे रोजी धरणातील पाणीसाठ्याने उणे पातळी गाठली होती. दरवर्षी सरासरी ऑगस्ट महिन्यात धरण मृतसाठ्यातून बाहेर येते. पण, मागील वर्षी (सन २०२५) मे महिन्यात वळीवाच्या मोठ्या पावसामुळे धरण मृतसाठ्यातून बाहेर आले होते. यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण मृतसाठ्यातून बाहेर आले. यापूर्वी १७ जुलै २०२० रोजी धरण मृतसाठ्याच्या बाहेर आले होते. यंदा पाच वर्षांनंतर धरण जुलै महिन्यात मृतसाठ्यातून बाहेर पडले आहे.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
सोलापूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यालगतच्या सीमेवरील उमराणी येथे भीमा नदीवर कर्नाटकने मोठा बंधारा बांधून नदीपात्रात पाणी अडविले आहे. टंचाईच्या पाश्वर्भूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीज पुरवठा केला जातो, तर कर्नाटकात सलग सात तास वीजपुरवठा सुरू आहे. दीड महिन्यापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांच्यावर सुरू असलेला अन्याय थांबवा, अशी मागणी होत आहे. अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, पण त्यानंतरही प्रशासनाने वीजपुरवठा सुरळीत केलाच नाही. वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी संगम येथे भीमेत मिसळत आहे. अद्यापही सोलापुरात पाऊस नसल्याने पिके करपत आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावातील वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे यांनी दिला. संघटनेतर्फे त्या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना देण्यात आले आहे.
