सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी ठरलेल्या उजनी धरणाने अखेर रविवारी (दि. १२) सायंकाळी उशीरा ५० टक्के पाणीसाठ्याचा टप्पा पार केला आहे. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे मृत साठ्यात अडकलेले धरण अवघ्या एका आठवड्यात पन्नास टक्क्यांवर पोहोचले आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, गेल्या चार दिवसांपासून भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर ओसरल्याने दौंड येथून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग आता अवघा ६ हजार ५०० क्युसेकवर आला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी तूर्तास ५० टक्क्यांवरच स्थिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतीपंपांना ५ तास वीजपुरवठा
शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला असला तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे चालू वर्षातील खरीप हंगाम जवळपास वाया गेला असून, आता शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बी हंगामावर असणार आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा वाढल्याने नदीकाठच्या गावातील शेतीपंपांचा वीजपुरवठा २ तासांवरून आता ५ तासांपर्यंत वाढवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे चिंतेत असलेल्या सोलापूरकरांसाठी जुलैचा पहिला आठवडा वरदान ठरला. भीमा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग १ लाख ५० हजार क्युसेकच्या पुढे गेला होता, त्यामुळे धरण मृत साठ्यातून बााहेर येत थेट पन्नाशीचा टप्पा गाठला. सध्या धरणात एकूण ९०.६८ टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा २७.०२ टीएमसी इतका झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनी धरण ५० टक्के भरण्यासाठी २४ दिवस उशीर झाला आहे. गतवर्षी (२०२५ मध्ये) उजनीने अवघ्या १७ जून रोजीच ५० टक्क्यांचा टप्पा गाठला होता.
मागील सात वर्षांत उजनीने ‘पन्नाशी‘ गाठलेल्या तारखा…
• २०२० : १० ऑगस्ट
• २०२१ : १ ऑगस्ट
• २०२२ : १९ जुलै
• २०२३ : ३ ऑक्टोबर
• २०२४ : ३१ जुलै
• २०२५ : १७ जून
• २०२६ : १२ जुलै
