पालकमंत्री भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही; भाजपचे सुभाष देशमुख यांचा इशारा

सोलापूर : उजनी धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क सोलापूर जिल्ह्याचा असताना याच जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे सोलापूरवर अन्यायाचा वरवंटा फिरवत स्वत:च्या इंदापूर आणि बारामतीला पाणी पळवून नेत आहेत. हे कृत्य पालकमंत्री म्हणून दिलेल्या जबाबदारीला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे भरणे यांना यापुढे जिल्ह्यात कोठेही फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपचे नेते, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

उजनी धरणाचे पाणी वाटप पूर्ण होऊन नवीन प्रकल्पास देण्यास पाणी शिल्लक नसतानाही उचलून लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली उजनी धरणातील पाणी इंदापूर व बारामतीला नेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३४८ कोटी खर्चाच्या या योजनेला प्रशासकीय मान्यताही मिळविण्यात पालकमंत्री भरणे यशस्वी झाले आहेत. परंतु हा निर्णय सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारा असल्यामुळे त्याविरोधात सोलापुरात आंदोलन पेटले आहे. यात पालकमंत्री भरणे यांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. या प्रश्नावर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीसह विविध संघटनांनी हे आंदोलन पेटविले आहे. यासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री भरणे यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करून त्यांना सोलापूर जिल्ह्यात कोठेही फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला उचलून नेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी गेल्या वर्षी घाट घातला होता. परंतु त्यास वेळीच विरोध झाल्यामुळे त्यांचा डाव यशस्वी झाला नव्हता. परंतु वर्षांनंतर आता भरणे यांनी डाव साधला आहे. पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी असते, त्या जिल्ह्याचा विकास तर दूर राहिला, पण त्याच जिल्ह्यातील हक्काचे पाणी स्वत:च्या मतदारसंघात पळवून नेण्याचे निष्ठूर आणि स्वार्थी कृत्य भरणे यांनी केल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे. अशा विश्वासघातकी भरणे यांना सोलापुरात पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अधिकार नाही. त्यांना जिल्ह्यात जागोजागी रोखण्यासाठी सर्वपक्षीय आजी- माजी लोकप्रतिनिधींसह सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी व नागरिक संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘उजनी’ प्रश्नावर सोलापुरात तृतीयपंथीयही उतरले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करून उजनी धरणाचे पाणी थेट स्वत:च्या इंदापूर व बारामतीला नेण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क तृतीयपंथीय मंडळींनी एकत्र येत ‘पालकमंत्री हाय हाय’ म्हणत, प्रतीकात्मक दगडावर जलाभिषेक केला.

या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व तृतीयपंथीयांनी उजनी पाणी प्रश्नावर तीव्र भावना मांडत पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. जिल्ह्यात एखाद दुसरा अपवाद वगळता बहुसंख्य सिंचन योजना अर्धवट आहेत. या योजना पूर्ण झाल्यास जिल्ह्यात उजनी धरणाचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येईल आणि शेतकऱ्यांच्या अंगणात खऱ्या अर्थाने नंदनवन फुलणार आहे. परंतु त्यासाठीची जबाबदारी टाळून, आपण सोलापूरचे पालकमंत्री आहोत, सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आपले कर्तव्य आहे, हेच भरणे विसरले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री आणि विकास मात्र इंदापूर व बारामतीचा, हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देताना या तृतीयपंथीयांनी भरणे यांची पालकमंत्री म्हणून काम करण्याची विश्वासार्हता गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सोलापुरात आठवडय़ातून एकदाच पिण्याचे पाणी मिळते. शेतीलाही वर्षांनुवर्षे उजनीच्या पाण्याची केवळ प्रतीक्षाच आहे. तुम्हाला कारभार जमत नसेल तर आम्हा तृतीयपंथीयांकडे कारभार द्या, असेही त्यांनी सुनावले. याच आंदोलनात एका तरुण पोतराजाने सहभागी होताना पालकमंत्री भरणे यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ स्वत:वर आसूड मारून घेतले. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.